६० शेततळ्यांनी डोंगरहळदी शिवार झाले जलमय

By admin | Published: July 29, 2016 12:55 AM2016-07-29T00:55:21+5:302016-07-29T00:55:21+5:30

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिवारातील आवश्यतेप्रमाणे जलसंधारणाची वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली आहे.

60 farmers have become waterlogged in the hillocks | ६० शेततळ्यांनी डोंगरहळदी शिवार झाले जलमय

६० शेततळ्यांनी डोंगरहळदी शिवार झाले जलमय

Next

७४.५० टीसीएम पाणीसाठा : ५० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा
चंद्रपूर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिवारातील आवश्यतेप्रमाणे जलसंधारणाची वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी शिवारात बहुतांश शेतकरी धानाचे उत्पन्न घेतात. धानास मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासत असते. शिवारातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवार अभियानातून तब्बल ६० शेततळे खोदण्यात आले आहे. या शेततळ्यांमुळे डोंगरहळदी शिवार जलमय झाले असून कोरडवाहू जमिनी हक्काच्या सिंचनाखाली आली आहे.
तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरहळदी या गावात आदिवासी व अल्पभुधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. शिवारातील जमिनी बहुतांश कोरडवाहू आहे. सिंचनाची सोय नसल्याने मान्सूनच्या पावसावर शेतकरी धानाचे पीक घेतात. पावसाने दगा दिल्यास धानाच्या पिकावरही पाणी सोडावे लागते. सिंचन व्यवस्था उपलब्ध झाल्यास खरीपातील धानाचे पीक चांगल्या पध्दतीने घेण्यासोबतच दुसरे व तिसरे पिकही शेतकऱ्यांना घेता येवू शकते. हा दृष्टीकोन समोर ठेवत कृषी विभागाच्या वतीने शिवारात तब्बल ६० शेततळ्यांचे क्लस्टर तयार करण्यात आले.
यातील ४९ शेततळे अभियानातून या वर्षी बांधण्यात आले असून ११ शेततळे जुने आहेत. डोंगरहळदी या गावाची कोरडवाहू शेती अभियानातर्गतही निवड करण्यात आली आहे. शेततळ्यांसोबतच शिवारातील बोडी नुतनीकरणाची ४ व मजगीची कामेही करण्यात आली. त्यामुळे शिवारातील बहुतांश शेतकऱ्यांकडे आता हक्काचे सिंचन उपलब्ध झाले आहे. पूर्वी शिवारातील शेतकरी एकच पिक घ्यायचे आता. दोन ते तिन पीके घेता येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

५० हेक्टर क्षेत्राला पाणी
शेततळ्यांमुळे शिवारात ७४.५० टीसीएम इतका पाणी साठा निर्माण झाला आहे. परिसरातील ५० हेक्टरला या पाणीसाठ्यातून एक प्रवाही पाणी पातळी देता येणार आहे. जलयुक्त अभियानातून झालेल्या या कामांचा परिसरातील आदीवासी व अल्पभुधारक शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे. साचलेल्या पाण्यातून डिझल पंपाव्दारे पाण्याची उचल करुन पिकास पाणी देता येईल. २० शेततळे हे ३० बाय ३० आकाराचे तर २९ शेततळे २० बाय २० आकाराचे बांधण्यात आले आहे.
डिझल इंजिनचे प्रस्ताव
शिवारात ६० शेतकऱ्यांकडे शेततळे झाले आहे. या शेततळ्यांतून शेतकऱ्यांना डिझल इंजिन लावून पाणी उचलता यावे व सिंचन करता यावे म्हणून आदिवासी विकास विभागाच्या योजनेअंतर्गत आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांना डिझल इंजिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या पाठपुराव्याने प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

 

Web Title: 60 farmers have become waterlogged in the hillocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.