६० ग्रामपंचायतींना मिळणार नव्या इमारती
By admin | Published: July 23, 2016 01:30 AM2016-07-23T01:30:00+5:302016-07-23T01:30:00+5:30
जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारती पाडून नवीन इमारती बांधण्याचा निर्णय ...
जीर्ण इमारती पाडणार : जिल्हा परिषदेच्या सभेत निर्णय
चंद्रपूर : जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारती पाडून नवीन इमारती बांधण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयाला सभेत मंजूरी प्रदान करण्यात आली असून लवकरच निधी उपलब्ध करून ग्राम पंचायतींना नव्या इमारती बांधून देण्यात येणार आहेत.
शुक्रवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विरोधी सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही दिवसांपूर्वी जिवती तालुक्यातील मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे एका युवतीला जीव गमवावा लागला. तर चिमूर तालुक्यातील लावारीसह काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका कर्तव्य बजावत नसल्याची तक्रार सतीश वाजूरकर यांनी केली होती. त्यावरही कारवाई करण्यात आली नाही. पण, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्याने विरोधक आक्रमक होते.
काही दिवसांपुर्वी संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींची पाहणी केली. या पाहणीत ६० ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण असल्याचा अहवाल पंचायत विभागाला पाठविला होता. तसेच त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्यांनीही इमारतींची समस्या जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांच्याकडे मांडली होती.
त्यामुळे शुक्रवारच्या विशेष सभेत याा विषयावर चर्चा झाली व ६० ग्रामपंचायती पाडण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. नव्या इमारतींसाठी निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश, जि. प. अध्यक्ष गुरूनुले यांनी पंचायत विभागाला दिले आहेत.
यासोबतच जनावरांच्या आजारावर तातडीने उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय संस्था, पशुवैद्यकीय रुग्णालयांना तातडीने औषध पुरवठा करण्यासाठी ७५ लाखांचा निधी खर्च करण्याची मंजूरी प्रदान करण्यात आली. यासोबत ब्रह्मपुरी तालुक्यातील नान्होरी, सिंदेवाही तालुक्यातील शिवणी, गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे नवे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)
दोन तासात गुंडाळली सभा : अहीरकर
सभा सुरू असताना वीज गेल्याने वीज येण्याची प्रतीक्षा न करता, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी सभा दोन तासात गुंडाळण्याचा विक्रम केला. गैरव्यवहारावर चर्चा होवू नये म्हणून जि. प. अध्यक्षांच्या सांगण्यानुसार जाणीवपुर्वक वीज पुरवठा बंद करण्यास आला, असा आरोप काँग्रेसचे जि. प. उपगटनेता विनोद अहीरकर यांनी केला आहे. अध्यक्षांच्या कार्यपद्धतीने सर्व जि. प. सदस्य नाराज असून ३ महिन्यातून एकाच होणाऱ्या सभेत केवळ गैरव्यवहार लपविण्यासाठी सभा गुंडाळून टाकणे चुकीचे असून तातडीने पुन्हा सभा बोलवावी, असे विनोद अहीरकर यांनी म्हटले आहे.