जीवती पंचायत समितीत ६० पदे रिक्त
By admin | Published: January 4, 2015 11:09 PM2015-01-04T23:09:55+5:302015-01-04T23:09:55+5:30
तालुक्यातील कोणत्याही कामाचे नियोजन, त्याची अमंलबजावणी त्या-त्या विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. परंतु जिवती तालुका हा जिल्ह्यात एकमेव तालुका असा आहे
जिवती : तालुक्यातील कोणत्याही कामाचे नियोजन, त्याची अमंलबजावणी त्या-त्या विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. परंतु जिवती तालुका हा जिल्ह्यात एकमेव तालुका असा आहे की, येथील पंचायत समितीमध्ये विविध विभागातील एकूण ६० पदे अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे या तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचा शेवटचा तालुका म्हणून जिवतीची ओळख आहे. अतिमागास आणि अतिदुर्गम असलेला हा तालुका अनेक सोईसुविधांपासून अद्यापही वंचित आहे. येथील गावाचा विकास व्हावा त्यांना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्या, शासकीय कामे त्वरित व्हावी, यासाठी शासनाच्या विविध विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यक असताना येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. हा तालुका अतिदुर्गम क्षेत्रात मोडतो. त्यामुळे या तालुक्यात रुजू होण्यास कर्मचारी तयार नसतात. पण त्यांना रुजू करुन घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वा पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. विकासापासून कोसो दूर असलेल्या या तालुक्यात एवढी पदे रिक्त असताना जिल्हा परिषद प्रशासन गप्प का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिवती पंचायत समितीत गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहायक पशुधन अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक बांधकाम विभाग, ज्येष्ठ सहायक, पशुधन पर्यवेक्षक, वनोपचारक, पदविधर शिक्षक, परिचर (पंचायत समिती), परिचर (पशुसंवर्धन विभाग) परिचर जि.प. बांधकाम ही पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेली ही पदे भरण्याकडे अधिकारी आणि पदाधिकारी कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत. जिवतीच्या जि.प. सदस्य सुजाल भगत यांनी रिक्त असलेली पदे भरण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचा सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश मिळते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)