६११ शाळांना ‘अ’ दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:28 AM2017-11-20T00:28:53+5:302017-11-20T00:29:26+5:30
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शाळासिद्धी उपक्रम सुरु केला.
परिमल डोहणे ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शाळासिद्धी उपक्रम सुरु केला. या उपक्रमानुसार शाळा प्रशासनाने केलेल्या स्वयंमुल्याकनानुसार जिल्ह्यातील ६११ शाळांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. तर एक हजार ७८३ शाळांना ‘ब’ श्रेणी व ९५ शाळांना ‘क’ श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. मात्र ५० शाळांनी उदासीनता दाखवत या उपक्रमात सहभागच घेतला नाही.
संपूर्ण शाळांना दर्जानुसार श्रेणी देण्यासाठी केंद्रस्तरावरुन शाळासिद्धी प्रणाली तयार करण्यात आली होती. शाळांमधील पायाभूत सुविधा व गुणवत्तेच्या निकषांच्या आधारावर शाळांना श्रेणी देण्यात येते. त्यासाठी ४६ मानके व सात क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्यांदा मुख्यमध्यापकांना स्वत: शाळेचे मुल्यमापन करायचे होते. यामध्ये जिल्ह्यातील २ हजार ५३९ शाळांपैकी २ हजार ४२२ शाळेने शाळासिद्धी उपक्रमातंर्गत मुल्यमापन केले होते. त्यापैकी सहभागी झालेल्या शाळांपैकी ६७ शाळांनी पोर्टलवर अर्धवट माहिती भरली. तर ५० शाळांनी अर्जच सादर केले नाही.
शाळासिद्धी उपक्रमातंर्गत स्वयंमूल्यमापनात शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शिक्षकांची कामगिरी या आधारावर शाळेने स्वयंमुल्यमापण केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६११ शाळांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा, तर १ हजार ७८३ शाळांना ब श्रेणी, ९५ शाळांना क श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. मात्र या उपक्रमात ५० शाळांनी सहभागच घेतला नाही.
अजूनही बाह्यमुल्यमापन नाही
मुख्यध्यापकांच्या माध्यमातून शाळेचे स्वयंमूल्यमापन केल्यानंतर आलेल्या गुणांनुसार श्रेणी देण्यात आली. त्यानंतर शाळेचे बाह्यमुल्यमापन करण्यात येणार होते. मात्र अद्यापही कोणत्याही शाळेचे बाह्यमुल्यमापन करण्यात आले नाही. त्यामुळे स्वत: शाळेने मुल्यमापन करुन दिलेली श्रेणी योग्य आहे की नाही, याबाबत संभ्रम दिसून येत आहे.
मुल्यमापनासाठी डाएटने केले प्रयत्न
शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा सातत्यपूर्ण शैक्षणिक संस्था (डाएट) तर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर केंद्रस्तरावरील सर्व शिक्षकांच्या १२५ केंद्रावर विशेष कार्यशाळा घेण्यात आल्या. यात एक हजार ९६८ शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ८४८ मुख्याध्यापकांनी तर ५ हजार ९९९ शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
शाळासिद्धी उपक्रमातंर्गत वर्षभरापूर्वी शाळांना टूल देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षकांनी आपल्या श्रेणीत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच डीआयसीपीडीच्या माध्यमातूनही प्रयत्न करण्यात येत आहेत.
- धनंजय चापले
प्राचार्य, डाएट कॉलेज, चंद्रपूर.