चंद्रपुरात ६२० किलो प्लास्टीक जप्त, दुकानदारावर पाच हजारांचा दंड 

By राजेश मडावी | Published: June 20, 2023 01:54 PM2023-06-20T13:54:02+5:302023-06-20T13:56:26+5:30

मनपाची कारवाई : राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी 

620 kg plastic seized in Chandrapur by municipal corporation, shopkeeper fined Rs 5,000 | चंद्रपुरात ६२० किलो प्लास्टीक जप्त, दुकानदारावर पाच हजारांचा दंड 

चंद्रपुरात ६२० किलो प्लास्टीक जप्त, दुकानदारावर पाच हजारांचा दंड 

googlenewsNext

चंद्रपूर : शहरातील भानापेठ येथील शक्ती पान मटेरियल दुकानावर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने धाड टाकून सोमवारी (दि.१९) दुपारी ६२० किलो प्लास्टीक जप्त केले. प्लास्टीक  साठा करणाऱ्या मालमत्ताधारकास पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

भानापेठ येथील शक्ती पान मटेरियल येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टीक साठा असल्याची माहिती मनपा उपद्रव शोध पथकास मिळाली.  या माहितीच्या आधारे छापा टाकला असता दुकानात ६२० किलो प्लास्टीक आढळले. बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा केल्याने हा माल जप्त करून गोदाम मालकास पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी आहे.

महाराष्ट्र प्लास्टिक, थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार ५०० रुपये जागेवर, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड, दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा अशी तरतूद आहे. ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार, स्वच्छता निरीक्षक जगदीश शेंद्रे, मनीष शुक्ला, अनिल खोटे,  भरत बिरिया, बंडू चहारे, विक्रम महातव, डोमा विजयकर, अमरदीप साखरकर आदींनी केली.

कापडी पिशव्यांचा पर्याय 

मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापर होऊ नये, यासाठी मनपाकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. प्लास्टीक पिशवीला पर्याय म्हणून मनपामार्फत विकल्प थैला नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आला. आतापर्यंत ७२३ दुकानदारांनी विकल्प थैलाच्या वापरास सुरूवात केली. मनपाने ४२ हजार ६६७ कापडी पिशव्यांचे वितरण केले आहे.

Web Title: 620 kg plastic seized in Chandrapur by municipal corporation, shopkeeper fined Rs 5,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.