६४ दिवसांपासून ‘ते’ विद्यार्थी शाळाबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:02 AM2018-03-05T00:02:17+5:302018-03-05T00:02:17+5:30
कोरपना तालुक्यातील एकमेव आयएसओ जिल्हा परिषद शाळा, गेडामगुडा पटसंख्येअभावी बंद झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे.
आशिष देरकर।
आॅनलाईन लोकमत
कोरपना : कोरपना तालुक्यातील एकमेव आयएसओ जिल्हा परिषद शाळा, गेडामगुडा पटसंख्येअभावी बंद झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभा बोलावून आमची शाळा सुरू करा म्हणून ग्रामसभेत मागणी केली व तसा ‘पेसा’ ग्रामसभेचा ठराव सर्वानुमते मंजूर करून घेतला. मात्र शाळा सुरु न झाल्याने ६४ दिवसांपासून येथील विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे वास्तव समोर आले आहे.
येथील ग्रामस्थ इतर कोणत्याची शाळेत आपले विद्यार्थी पाठविण्यास तयार नसून शिक्षण विभाग, तेथील पूर्वीचे मुख्याध्यापक लहू नवले येथील विद्यार्थ्यांना इतर शाळेत पाठविण्यासाठी गावात जाऊन प्रयत्न करीत आहे. मात्र गावकºयांनी एकच निर्णय घेतल्याने शिक्षण विभागाची पंचाईत झाली आहे. आमची शाळा सुरु झाल्यावरच आमचे विद्यार्थी शाळेत जातील, असा पवित्र येथील लोकांनी घेतला आहे.
परीक्षेचे दिवस जवळ आलेले आहे. विद्यार्थी दोन महिन्यांपासून शाळेत न गेल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहेत. येथील विद्यार्थी शिक्षणातही हुशार होते. मात्र ६४ दिवसांचा खंड पडल्याने विद्यार्थ्यांसह पालक फार हताश झाले आहे. आज नाही तर उद्या माय-बाप सरकार निर्णय घेऊन किमान गुणवत्तेच्या आधारावर आमची शाळा सुरु करतील, या आशेवर असलेल्या गावकºयांच्या पदरी निराशाच आलेली आहे.
शाळेविषयी वृत्तपत्रात व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या धडकल्या. विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असताना मात्र खासदार, आमदार यासारख्या लोकप्रतिनिधींनी गावाला साधी भेट दिली नसल्याने गावकºयांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद शाळा गेडामगुडा या शाळेने विद्यार्थ्यांना चांगले घडविले आहे. पालकांनी स्वत:ची शाळा समजून शाळेला मोठे योगदान दिले आहे. शेकडो शिक्षकांनी शाळेला भेटी दिल्या आहे. लोकसहभागातून शाळा घडली असल्यामुळे शाळेविषयी गावकऱ्यांना अभिमान आहे.
शासन अनभिज्ञ
६४ दिवसांपासून विद्यार्थी शाळाबाह्य असून शासनास या गंभीर बाबीची कल्पना नसावी, ही मोठी शोकांतिका आहे. जिल्हास्तरावरून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन अहवाल सादर करण्याची गरज आहे. आरटीईनुसार एकही विद्यार्थी शाळाबाह्य असू नये, असे शासनाचे धोरण असताना शासनालाच या धोरणाचा विसर पडला की काय, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
-तर विद्यार्थी नक्षलवादी बनतील
आमचे विद्यार्थी शिकावे, असे शासनाला वाटत नसेल तर खुशाल शाळा बंद ठेवावी. मात्र आम्ही दुसºया शाळेत विद्यार्थी पाठवणार नाही. गावातील शाळा आमच्यासाठी दैवत आहे. शाळा बंद करून मुलांना इतर शाळेत पाठविण्यास आमचा नकार आहे. मग आमचे विद्यार्थी नक्षलवादी झाले तरी चालेल.
- विठ्ठल गेडाम, माजी सरपंच