कृषी विभागाच्या फलोत्पादन अभियानाचा ६४५ शेतकऱ्यांना लाभ
By admin | Published: September 28, 2016 12:50 AM2016-09-28T00:50:17+5:302016-09-28T00:50:17+5:30
पारंपारिक शेतीला फळबागांची जोड देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन अभियान योजना राबविली जात आहे.
४ कोटी ६ लक्ष रूपयांचे अनुदान वाटले : यावर्षी ५२ लाखांचा आराखडा
चंद्रपूर : पारंपारिक शेतीला फळबागांची जोड देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन अभियान योजना राबविली जात आहे. फळझाडांना प्रोत्साहन देण्यासोबतच या पीक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरली आहे. जिल्ह्यात ६४५ शेतकऱ्यांनाी या योजनेंतर्गत फळबागांची लागवड करत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.
फलोत्पादन अतिशय फायद्याची शेती आहे. विविध प्रकारच्या फळांना बाजारात चांगली मागणी असून दरही चांगला मिळत असल्याने या शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे फार आवश्यक आहे. त्यामुळेच पारंपारिक पिकांसोबतच काही क्षेत्रात फळ पिकेही घ्यावीत, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. फळ पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविले जात आहे. शेतकऱ्यांना फळ शेतीकडे वळविण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान हे अभियान उपलब्ध करून देत आहे.
अभियानाच्या क्षेत्र विस्तार या घटकांतर्गत फळबागांमध्ये पपई, केळी, मसाला पीक, हळद, मिरची लागवड व पुष्पोत्पादन या पिकांसह त्यासाठी आवश्यक संरक्षित शेती या घटकांतर्गत हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी, प्लॉस्टीक मल्चींग, शेडनेट हाऊस, हरीतगृह यामध्ये उच्च दर्जाची भाजीपाला लागवड व साहित्य आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते.
सदर योजनेतील काही घटक शंभर टक्के अनुदानावर राबविले जातात. तर काही ५० व ३५ टक्के अनुदानावर आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४ कोटी ६ लाखांचे अनुदान विविध बाबींसाठी आतापर्यंत अदा करण्यात आले आहे. यावर्षी सुध्दा ५२ लाख रूपयांचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र फलोत्पादनाखाली आणण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)