बाधित गावांना ६६ टक्के निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:36 PM2018-09-11T22:36:35+5:302018-09-11T22:37:02+5:30
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून ६६ टक्के निधी जिल्ह्यातील ६०६ प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे. यातून कोणतेही गाव सुटू नये याची दक्षता घ्यावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून ६६ टक्के निधी जिल्ह्यातील ६०६ प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे. यातून कोणतेही गाव सुटू नये याची दक्षता घ्यावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी कुणाल खेमकर, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, अधीक्षक अभियंता, जिल्हा खनिकर्म अधिकारी कांबळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. ना. हंसराज अहीर म्हणाले, जिल्ह्यातील नगर आयुक्त, मुख्याधिकारी व सरपंचांनी खनिज निधीबाबत अत्यंत जागरूक राहून आपल्या हक्काचा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा. गावाच्या गरजेनुसार प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा. प्रकल्पग्रस्त क्षेत्रामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी ही मोठी गरज आहे. त्यासाठीच आरओ वॉटर एटीएम लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
बाजार ओट्यांचे सौदर्यीकरण, शाळा, ग्रा.पं., ग्रामीण पाणीपुरवठा यासारख्या स्थानिक उपक्रमात सोलर वीज व्यवस्थेसाठी योजना सुरू करण्यात येणार आहे. पांदन रस्त्याचा मोठा प्रश्न असून खनिज विकास अंतर्गत पांदन रस्ते तयार करण्याची जिल्ह्यात संधी आहे. त्याकरिता निधी कमी पडू देणार नाही, असेही ना. अहीर यांनी सांगितले. हा निधी गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्यास प्रत्येक बाधीत व अप्रत्यक्ष बाधीत गावे व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निधी वाटप केल्यास तो न्यायोचित ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोणत्या योजना सुरू आहेत, याची माहिती जिल्हाधिकारी खेमणार व अन्य अधिकाºयांनी बैठकीत माहिती दिली.