Chandrapur | ६६ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा; निळ्या पाखरांची अस्थिकलशाला मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 05:11 PM2022-10-17T17:11:50+5:302022-10-17T17:17:14+5:30
दीक्षाभूमी गर्दीने फुलली; समता सैनिक दलाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष
चंद्रपूर : कोरोना संकटाच्या दोन वर्षांनंतर ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त रविवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पथसंचलन करून मानवंदना दिली. हजारो बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन करून ‘जयभीम’ चा नारा दिला. दोन वर्षांनंतर हजारो अनुयायांची पाऊले दीक्षाभूमीकडे वळली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्यावतीने फुलांनी सजविलेल्या रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश ठेवण्यात आला होता. त्यानंतर आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई होते. प्रमुख अतिथी म्हणून भदन्त नागसेन नागपूर, भदन्त महानागा, भदन्त धम्मबोधी नागपूर, भदन्त धम्मप्रकाश, भदन्त धम्मविजय, भदन्त धम्मशीला, भदन्त अश्वजीत, भदन्त नागाप्रकाश, मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर, संस्थेचे उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, संस्थेचे सचिव वामन मोडक, संस्थेचे सहसचिव कुणाल घोटेकर, संस्था सदस्य ॲड. राहुल घोटेकर, प्राचार्य डाॅ. राजेश दहेगांवकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जटपुरा गेट, पाण्याची टाकीमार्गे मिरवणूक दीक्षाभूमीवर पोहोचली. मिरवणुकीत समता सैनिक दलाचे ५०० सैनिक सहभागी झाले होते. मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले. ही मिरवणूक ऐतिहासिक दीक्षाभूमीवर पोहोचताच भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांचा अस्थिकलश बुद्ध विहारात नागरिकांना मानवंदना देण्यासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर समता सैनिक दलाच्या पथकाने भदन्त सुरेई ससाई व मान्यवरांना मानवंदना दिली.
रविवारी सकाळी ११ वाजता भारतभूमीतील तथागत बुद्ध, सम्राट अशोक आणि बाबासाहेब आंबेडकर यांची शांतीपूर्ण क्रांती आणि धम्मक्रांतीची प्रासंगिकता या विषयावर परिसवांद आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी राजेश वानखेडे, प्रमुख वक्ते चंद्रभाऊ ठाकरे, धम्मचारी रुतायुष नागलोक, प्रास्ताविक प्राचार्य डाॅ. राजेश दहेगांवकर यांनी केले.
मुख्य समारंभाला उसळली अनुयायांची गर्दी
रविवारी सायंकाळी ५ वाजता मुख्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर होेते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. वण्णासामी, डाॅ. यु. जटिला (म्यानमार), सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, पद्मश्री सुखदेव थोरात, लक्ष्मण माने, संस्था उपाध्यक्ष अशोक घोटेकर, उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, सचिव वामन मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, सदस्य ॲड. राहुल घोटेकर, प्राचार्य राजेश दहेगांवकर आदींची यावेळी उपस्थिती होती. संचालन प्रा. मनोज सोनटक्के यांनी केले तर आभार वामन मोडक यांनी मानले.
अस्थिकलशाला वंदन
दीक्षाभूमी येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध अनुयायांनी विहारात ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला वंदन केले. रात्री उशिरापर्यंत हजारो बौद्ध अनुयायांचे दीक्षाभूमीवर आगमन सुरूच होते.
धम्म संध्येने वेधले लक्ष
सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे तसेच संच आणि गायिका वैशाली माडे व संच यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी हजेरी लावली.
'जय भीम'च्या घोषणेणे निनादले चंद्रपूर
‘बौद्ध धम्म चिरायू हो’, ‘डॉ. बाबासाहेबांचा विजय असो’ अशा विविध घोषणा देत मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे संचालन समता सैनिक दलाचे जवान करीत होते. या मिरवणुकीत समता सैनिक दलाचा पोशाष तसेच पांढरा गणवेश परिधान केलेले पुरूष, महिला व बालके सहभागी झाले होते. शहरातील विविध वाॅर्डातील स्त्री-पुरूषांचे जत्थे मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक जटपुरा गेट मार्गाने निघाली. मिरवणूक पाहण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
चंद्रपूर भीममय
दोन वर्षानंतर येथील दीक्षाभूमीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अस्थिकलशाला वंदन करण्यासाठी जिल्ह्यातीलच नाही तर बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांनीही हजेरी लावली. यामुळे चंद्रपूर भीममय झाल्याचे दिसत होते.