सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस
By admin | Published: June 28, 2014 11:28 PM2014-06-28T23:28:51+5:302014-06-28T23:28:51+5:30
वरूणराजाच्या अवकृपेने यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. यावर्षी पावसाच्या २८ दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस पडला. १ जूनपासून केवळ दोनदा दमदार पावसाने हजेरी लावली.
केवळ १५ टक्के पेरण्या आटोपल्या : जिल्ह्यातील खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट
चंद्रपूर : वरूणराजाच्या अवकृपेने यंदा खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. यावर्षी पावसाच्या २८ दिवसांमध्ये सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के पाऊस पडला. १ जूनपासून केवळ दोनदा दमदार पावसाने हजेरी लावली. त्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र त्याचीही टक्केवारी केवळ १५ टक्के आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. तेव्हापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी अद्याप पिकाला पोषक अशा पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंतित आहेत.
१ जून ते २८ जूनपर्यंत पडलेला पाऊस असा आहे. चंद्रपूर ८९.३० मि.मी., बल्लारपूर ५४.८० मि.मी., गोंडपिपरी ६५.६८ मि.मी., पोंभुर्णा २५.५ मि.मी., मूल ५०.२२ मि.मी., सावली ९६.२५ मि.मी., वरोरा १४७.४४ मि.मी., भद्रावती ३८.०० मि.मी., चिमूर ३६.२० मि.मी., ब्रह्मपुुरी ६८.३० मि.मी., सिंदेवाही ७५.८६ मि.मी., नागभीड ३९.७० मि.मी., राजुरा २.७ मि.मी., कोरपना ३७.१० मि.मी., तर जिवती तालुक्यात ७६.२९ मि.मी. पाऊस पडला.
जिल्ह्यात सर्वाधिक १४७.४४ मि.मी. पाऊस वरोरा तालुक्यात कोसळला तर सर्वात कमी २.७ मि.मी पाऊस राजुरा तालुक्यात कोसळला. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे सारे गणित पावसावरच अवलंबून असते. मात्र यंदा महिना लोटूनही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. (प्रतिनिधी)