६,८५३ बनावट मतदार घुसविण्याचा डाव फसला; निवडणूक प्रशासनाची पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 09:06 IST2024-10-20T09:03:40+5:302024-10-20T09:06:13+5:30
हेल्पलाईन सुविधेचा गैरफायदा घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी बनावट फॉर्म भरल्याचे उघडकीस आले आहे.

६,८५३ बनावट मतदार घुसविण्याचा डाव फसला; निवडणूक प्रशासनाची पोलिसात तक्रार
चंद्रपूर: राजुरा विधानसभा मतदारसंघात अज्ञात व्यक्तींकडून ऑनलाईन नोंदणीद्वारे ६ हजार ८५३ बनावट मतदारांची नावे समावेश केल्याचे उघडकीस आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. निवडणूक प्रशासनाने ही नावे रद्द करून शनिवारी (दि. १९) पोलिसात तक्रार केली. याप्रकरणांतील दोषींचा शोध घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलिस विभागाला दिले आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यांतून ३ ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाईन स्वरुपात नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६ हजार ८५३ अर्जांमध्ये अर्जदाराचा फोटो, जन्मतारीख व रहिवासीचा पुरावा, अर्जात नमूद नाव व पुरावा हा वेगवेगळया व्यक्तींचा हाेता.
हेल्पलाइनचा गैरफायदा
- व्होटर हेल्पलाइन ॲप किंवा एनव्हीएसपी याद्वारे ऑनलाइन स्वरूपात अर्ज आले होते.
- भारत निवडणूक आयोगामार्फत ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु, या सुविधेचा गैरफायदा घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी बनावट फॉर्म भरल्याचे उघडकीस आले आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील मतदार यादीत घोळ करणाऱ्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
-रविंद्र माने, मतदार नोंदणी अधिकारी.