वाघाच्या दहशतीत विद्यार्थ्यांची ७ कि.मी. पायपीट
By admin | Published: February 22, 2016 01:22 AM2016-02-22T01:22:48+5:302016-02-22T01:22:48+5:30
सावली तालुका व सिंदेवाही तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कन्हाळगाव येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सात किलोमिटरची पायपीट करून विद्यार्जन करावे लागत आहे.
पालक चिंताग्रस्त : वन विभागाने लक्ष द्यावे
ंसावली : सावली तालुका व सिंदेवाही तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कन्हाळगाव येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सात किलोमिटरची पायपीट करून विद्यार्जन करावे लागत आहे. एवढेच नव्हे तर जंगलव्याप्त असलेल्या पालेबारसा कन्हाळगाव या सात कि.मी. रस्त्यावर सतत वाघाचा वावर होत असल्याने पालक चिंताग्रस्त व भयभीत झाले आहेत.
कन्हाळगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी तेथील विद्यार्थ्यांना सावली तालुक्यातील पालेबारसा येथे पायी किंवा सायकलने जावे लागते. मात्र सदर सात कि.मी. च्या रस्त्यावर पाच कि.मी. परिसर संपूर्ण घनदाट जंगलाने व्याप्त आहे. तसेच या परिसरात जंगली श्वापदांचा सतत वावर असतो. सुर्दैवाने आतापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरी भविष्यात कधीही धोका संभवू शकतो. या चिंतेने त्यांचे पालक भयग्रस्त होत आहेत. कधी-कधी रस्त्यांवरच व्याघ्र दर्शन होत असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे टाळले आहे. दोन्ही तालुक्याच्या मुख्यालयापासून ३५ कि.मी. अंतरावर शेवटच्या टोकावर असलेले कन्हाळगाव या परिसरातील अतिशय दुर्गम गाव समजले जाते. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षानंतरही या गावात अनेक प्राथमिक सुविधांचा अभाव आहे.
महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांकरिता महामंडळाच्या एस.टी.ची सुविधा केली आहे. मात्र येथील विद्यार्थी या सुविधेपासून वंचित आहेत. पालेबारसा - कन्हाळगाव या मार्गाचे खडीकरण बऱ्याच वर्षापूर्वी झाले. मात्र ठिकठिकाणी रस्ता उखडल्यामुळे सायकलस्वार व पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या ब्रिटीशकालीन आसोलामेंढा तलावाच्या पोटात या गावाचे वास्तव्य आहे. त्यामुळे जंगलातील हिंस्त्र श्वापदांचा वावर दिवसा-रात्री कधी गावाच्या शेजारी होताना दिसतो. त्यामुळे कन्हाळगाव येथील गावकरी दहशतीत जीवन जगत आहेत. या गावातील प्राथमिक सुविधांची पुर्तता करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे खुशाल लोडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)