‘जाणता राजा’तून ७ हजार ५०० विद्यार्थ्यांनी जाणला महाराजांचा इतिहास
By साईनाथ कुचनकार | Published: February 7, 2024 04:53 PM2024-02-07T16:53:49+5:302024-02-07T16:54:06+5:30
चंद्रपूरमध्ये ४ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या महानाट्याला जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ५०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावत शिवाजी महाराजांचा इतिहास जाणला.
चंद्रपूर :छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. चंद्रपूरमध्ये ४ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या महानाट्याला जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ५०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावत शिवाजी महाराजांचा इतिहास जाणला.
चंद्रपूर, राजुरा, गोंडपिपरी, मूल, पोंभुर्णा, भद्रावती, बल्लारपूर आणि वरोरा या आठ तालुक्यातील इयत्ता ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या दररोज २ हजार ५०० विद्यार्थी याप्रमाणे एकूण ७ हजार ५०० विद्यार्थ्यांनी प्रयोगाला हजेरी लावली. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी दररोज ५३ बसेसची व्यवस्था केली होती. चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तीन दिवसात ७५०० ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोग अनुभवता आला.
बाॅक्स
‘याची देही...याची डोळा’
जिल्ह्यात ‘जाणता राजा’ या महानाट्याचे तीन दिवस प्रयोग झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहता, चंद्रपूर येथे एक अतिरिक्त दिवस वाढवून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हावासीयांना अनोखी भेट दिली. चार दिवसात हजारो नागरिकांनी ‘याची देही...याची डोळा’ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट प्रत्यक्षात अनुभवला. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे या महानाट्याने चंद्रपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.