मूल तालुक्यात रोहयोच्या कामांवर राबतात ७ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:12 PM2018-04-29T23:12:17+5:302018-04-29T23:12:17+5:30

ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी ग्रामपंचायतस्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

7 thousand laborers in Rohayo's work in the original taluka | मूल तालुक्यात रोहयोच्या कामांवर राबतात ७ हजार मजूर

मूल तालुक्यात रोहयोच्या कामांवर राबतात ७ हजार मजूर

googlenewsNext
ठळक मुद्दे४४ ग्रामपंचायतीअंतर्गत कामांना सुरुवात : पाच गावांना कामाची प्रतीक्षा

भोजराज गोवर्धन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी ग्रामपंचायतस्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे मूल तालुक्यातील ४४ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सुमारे ७ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. तर ५ ग्रामपंचायतीमध्ये अद्यापही कामाला सुरूवात झालेली नसल्याने या गावातील मजूर कामाच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रत्येक मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. या योजने अंतर्गत मूल तालुक्यातील ४९ गावांपैकी ४४ गावात विविध कामांना सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे ७ हजार मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे. मात्र तालुक्यातील चिमढा, आकापूर, काटवण, उथळपेठ आणि टेकाडी येथे अजुनही कामांना सुरूवात झाली नसल्याने तेथील मजूर कामाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे सावट आहे. यामुळे अनेक बेरोजगार युवक रोजगारासाठी इतरत्र स्थलांतरीत होत असताना रोहयोच्या कामांमुळे आधार मिळाला आहे.
मूल पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने तालुक्यात १७० कामे सुरू असून यामध्ये पांदण रस्ते ११, बोडी खोलीकरण ११, तलाव ५, नाला सरळीकरण ४, विहीर ८, शौचालय ९, घरकूल १०७, सिमेंट काँक्रीट रस्ता १ आणि वृक्षलागवडीच १४ कामे सुरू असून २५ एप्रिलपर्यंत ४ हजार १३१ मजूर कामावर होते. यानंतर चितेगाव, गडीसुर्ला, जुनासुर्ला, मरेगाव, मुरमाडी, उश्राळा येथे पांदण रस्ता, तलाव, घरकूल व इतर कामे सुरू करण्यात आले असून या ठिकाणी २ हजारच्या जवळपास मजूर कामावर आहेत. तालुक्यात रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून उर्वरीत ५ ग्रामपंचायतीमध्येही कामांना सुरूवात करावी, अशी अपेक्षा मजुरांनी केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका कार्यक्रम अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
मजुरांना शासनाच्या सुविधा
गावापासून ५ किमी पेक्षा जास्त अंतरावर रोजगार दिल्यास १० टक्के जास्त मजुरी राज्य शासनामार्फत, कामावर पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार व बरोबर आणलेल्या ६ वर्षाखालील लहान मुलांना सांभाळण्याची सोय, कामाच्या अनुषंगाने मजुरास किंवा बरोबर आणलेल्या लहान मुलास दुखापत झाल्यास रुग्णास सर्व रुग्णसेवा शासकीय खर्चाने व दैनिक मजुरीच्या ५० टक्केपर्यंत सानुग्रह रुग्ण भत्ता, अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास ५० हजार रूपयांपर्यंत सानुग्रह अनुदान रोहयो योजनेतून दिले जात आहे. त्यामुळे कामांवर मजुरांची संख्या वाढली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ५ गावात कामे सुरू झालेली नसून या गावांमध्येही लवकरच कामांना सुरूवात केली जाईल.
- एस. जी. पुरी
तालुका कार्यक्रम अधिकारी तथा प्रभारी संवर्ग विकास अधिकारी .

Web Title: 7 thousand laborers in Rohayo's work in the original taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.