७१२ विद्यार्थ्यांची नावे दोन आश्रमशाळेच्या हजेरीपटात; सरल अपडेशनमधून सत्य उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:44 AM2023-05-25T11:44:45+5:302023-05-25T11:45:51+5:30
अनुदानित आश्रमशाळांचा कारभार
मंगल जीवने
बल्लारपूर (चंद्रपूर) : सरळ प्रणालीला आधार कार्ड अपडेट नसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याबाबत सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकाऱ्यांनी सर्व अनुदानित आश्रमशाळांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माहिती सादर केली असता सरल २३ अनुदानित आश्रमशाळेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या ७१२ विद्यार्थ्यांची नावे दोन शाळेत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.
आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अनुदानित आश्रमशाळांनी दिलेल्या माहितीमध्ये बल्लारपूर व गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या गिलबिली येथील अनुदानित आश्रमशाळेतील निवासी ७६ व अनिवासी ५, गोंडपिपरी आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थी १५ व अनिवासी विद्यार्थी ३ कुडेसावली येथील निवासी विद्यार्थी ११४ व कोर्टी मक्ता आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थी २८ असे २३३ विद्यार्थ्यांचे नाव इतर शाळेत आधार कार्डवरून आढळले आहे. जिल्ह्यात एकूण अनुदानित २५ आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये ७ हजार ७५५ विद्यार्थी निवासी व अनिवासी ८४८ विद्यार्थी शिक्षण घेतात. सध्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मोहीम सुरू आहे.
आधार कार्ड अपडेटचाही प्रश्न
अनुदानित आश्रमशाळांना आधार कार्ड अपडेट नसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी शाळांना सूचना दिल्या. त्यानुसार, सर्व शाळांनी माहिती सादर केली. मात्र, यामध्ये ८ हजार ६०३ पैकी १ हजार ६६ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्याचे आढळून आले. ७१२ विद्यार्थ्यांचे नाव इतर दोन आश्रमशाळेत असल्याचे आढळून आले.
ज्या विद्यार्थ्यांची नावे आधार कार्डवरून दोन शाळेत आढळली. अशा विद्यार्थ्यांची नावे एका शाळेतून डिलीट करण्यात येईल. तो विद्यार्थी कोणत्याही एकाच अनुदानित आश्रमशाळेत राहील. यादृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे.
- शरद बोरीकर, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, बल्लारपूर