खरीपासाठी ७१३ कोटींचे कर्ज
By Admin | Published: July 1, 2016 12:59 AM2016-07-01T00:59:20+5:302016-07-01T00:59:20+5:30
गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यावर्षी शासन पुढे सरसावले आहे.
५११ कोटींचे कर्ज वाटप : पीक कर्ज मेळाव्याने शेतकऱ्यांना लाभ
ंचंद्रपूर : गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यावर्षी शासन पुढे सरसावले आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर कर्जासाठी पायपीट करण्याची वेळ येऊ नये, त्याला वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून यावर्षी प्रत्येक तहसील कार्यालयातर्फे शिबिराचे आयोजन करून कर्ज वाटप करण्यात आले. परिणामी १५ जूनपर्यंत ५११ कोटी ७८ लाख रूपयाचे पीक कर्ज वाटप झाले असून यावर्षी ७१३ कोटी ७७ लाख रूपयाच्या पीक कर्जातून खरीप पिकाची लागवड होणार आहे.
गतवर्षी खरीप हंगामासाठी ६८८ कोटी रूपयाच्या पीक कर्जाची मागणी होती. तर यावर्षी ही मागणी २५ कोटी रूपयांनी वाढून ७१३ कोटी रूपयाची झाली आहे. मागच्या काही वर्षातील पीक कर्जाची स्थिती पाहता, दरवर्षी मागणी वाढत आहे. हजारो, लाखो रूपयाचे पीक कर्ज घेऊन खरीप पिकाची लागवड होत असली तरी निसर्ग साथ देत नसल्याने दरवर्षी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. खरीप पीक पेरणी अहवाल तयार करून विविध बँकामार्फत कर्ज वाटपाचे उद्दीष्ठ निश्चीत केले जाते. मात्र अनेक शेतकऱ्यांना कर्जासाठी चकरा मारावे लागत होते.
याची दखल घेत शासनाने यावर्षी प्रत्येक तहसील कार्यालयात पीक कर्ज वाटप मेळावे आयोजित करून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तेथेच सोडवून त्यांना पीक कर्ज मिळवून देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आतापर्यंत विविध तहसील कार्यालयात पीक कर्ज मेळावे पार पडले व शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. १५ जूनपर्यंत जिल्ह्यात ७२ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
लक्षापेक्षा अधिक कर्ज वाटप
जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी पीक कर्ज वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र दरवर्षीच नियोजनापेक्षा अधिक कर्जाचे वाटप झाले आहे. २०१२-१३ मध्ये ३८० लाख ८८ हजार रूपयाचे कर्ज वाटपाचे नियोजन होते. यात ४०८ लाख ३४ हजार रूपयाचे कर्ज वाटप झाले. २०१३-१४ मध्ये ४६८ लाख ३२ हजार रूपयाचे कर्ज वाटप नियोजन होते. यात ५५९ लाख ८८ हजार रूपयांचे कर्ज वाटप झाले. तर सन २०१४-१५ मध्ये ५५९ लाख ८८ हजार रूपयांचे कर्ज वाटप नियोजन होते. यावर्षीही ५९९ लाख ४४ हजार रूपयांचे कर्ज वाटप झाले. तर गतवर्षी ६९१ कोटींचे पीक कर्ज वाटप झाले आहे
जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी
पीक कर्ज वाटपात दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी राहिली आहे. २०१२-१३ या वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०६ लाख ५६ हजार रूपयाचे पीक कर्ज वाटप केले. तर २०१३-१४ मध्ये २२६ लाख ७९ हजार, २०१४-१५ मध्ये ३६१ लाख २१ हजार, २०१५-१६ मध्ये ३९७ लाख रूपयाचे कर्ज वाटप केले आहे. यावर्षी ४५१ लाख ९५ हजार रूपयाचे कर्ज वाटपाचे नियोजन असून ७८ टक्के कर्ज वाटप झाले आहे.