बल्लारपूर तालुक्यात ७४ प्रकरणात दंडाची वसुली
By Admin | Published: November 26, 2015 12:56 AM2015-11-26T00:56:43+5:302015-11-26T00:56:43+5:30
तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण मिळविण्यासाठी तहसील प्रशासन प्रयत्नरत आहे.
तहसीलदारांची कारवाई : सहा लाखांवर केला महसूल जमा
बल्लारपूर : तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण मिळविण्यासाठी तहसील प्रशासन प्रयत्नरत आहे. आजतागायत बल्लारपूर तालुक्यात ७४ प्रकरणात दंडात्मक कारवाई करुन तब्बल ६ लाख २९ हजार ९४० रुपये महसूल शासनाकडे जमा केल्याची माहिती बल्लारपूरचे तहसीलदार डी. एस. भोयर यांनी ‘लोकमत’ला दिली.
बल्लारपूर तालुका लहान असून १७ ग्रामपंचायतीत ३२ गावांचा समावेश आहे. महसूल प्रशासनाचे प्रयत्न अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याचे आहे. त्यामुळे नियमित व परवानगीच्या रुपात तब्बल १४ लाख २९ हजार ४५२ रुपये तालुक्यातून जमा करुन शासनाच्या तिजोरीत जमा केले आहे. अवैध रेती वाहतूकधारकांवर आॅक़्टोबर महिन्याअखेर ५३ प्रकरणांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यातून तहसील प्रशासनाला ४ लाख ४३ हजार १६० रुपयांचा दंड वसूल करता आला.
त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात तहसील प्रशासनाने धडक मोहिम राबविली. यामुळे अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन कमाई करणाऱ्याचे धाबे दणाणले. या महिन्यात २१ जणावर दंडाची कारवाई केली. यामुळे महसूल विभागाला एक लाख ८६ हजार ७८० रुपये मिळाले. आजतागायत तहसील प्रशासनाने गौण खनिजाच्या उत्खननाच्या माध्यमातून २० लाख ५९ हजार ६१२ रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करण्याचे काम केले आहे. अवैध रेती वाहतूक दारावर आळा घातल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला आहे, असेही तहसीलदार भोयर यांनी सांगितले.
बल्लारपूर तालुक्यात अवैध रेतीच्या बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत, यावर विचारणा केली असता भोयर म्हणले, आम्ही अवैध रेती उत्खननावर लक्ष केंद्रीत केले आहे. वृत्त वस्तुस्थिला धरुन प्रकाशित केले जात नाही.
परिणामी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे मानसिक बळ खचते. याचा काम करतेवेळी त्रास होतो. अवैध रेती उत्खनन तालुक्यातून बंद करण्याची तयारी असून तालुक्यातील केबल चालकांनी नियमित वसुली न दिल्यास कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)