७५ अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींचे होणार निर्लेखन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:05+5:302021-02-07T04:26:05+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील ७५ अंगणवाडी इमारतींचे निर्लेखन करण्याचा ठराव जि. प. च्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला. ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील ७५ अंगणवाडी इमारतींचे निर्लेखन करण्याचा ठराव जि. प. च्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाच्या मॉडेल भवनाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी ठराव मांडण्यात आला. परंतु, जागा निश्चित नसल्याने आठकाठी निर्माण झाली आहे. पुढील आठवड्यात येणाऱ्या पंचायतराज समितीचा खर्च भागविण्यासाठी १५ लाखांच्या आकस्मिक तरतुदीलाही मान्यता देण्यात आली आहे.
जि. प. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेप्रसंगी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपाध्यक्ष रेखा कारेकार, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे, रोशनी खान व विभागप्रमुख उपस्थित होते. या सभेत महिला व बालकल्याण विभागाच्या मॉडेल भवनाचा विषय उपस्थित झाल्यानंतर आधी जागा निश्चित करा, नंतरच सभेची मंजुरी घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. नावीण्यपूर्ण योजनेतून विकासकामांसाठी जि. प. ला ५ कोटींचा निधी मिळाला आहे. या निधीचे सर्व सदस्यांना समप्रमाणात वाटप करण्यासंदर्भातही चर्चा झाली. चष्मे वाटपासाठी मिळालेल्या निधीला कात्री लावण्यात आली होती. परंतु, हा निधी तेवढाच ठेवावा, असेही ठरविण्यात आले. खनिजविकास निधीतून कोरोना काळात खरेदी केलेल्या २० रुग्णवाहिकांना कार्योत्तर मंजुरी मिळाली. ७५ अंगणवाड्यांसह १४ वर्गखोल्यांच्या निर्लेखनाचा ठराव मंजूर झाला. नियोजन समितीतून मिळालेल्या निधीतून अऱ्हेरनवरगाव आरोग्य केंद्र व मिनघरी उपकेंद्राच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. मुडझा, नवरगाव, नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे निर्लेखन करण्याचा ठराव घेण्यात आला. दरम्यान, बंधित आणि अबंधित निधीचे नियोजन सभागृहातील सदस्यांना विश्वासात न घेता केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे जि. प. सदस्य गजानन बुटके यांनी केला आहे.
हातपंप दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जि. प. च्या वाट्याला आलेल्या निधीचे ग्रा. पं. धर्तीवर नियोजन ठरविण्यात आले. फॉगिंग मशीन, ५६ जि. प. सदस्यांच्या क्षेत्रात लहान आरओ, शाळांमध्ये वॉटर कुलर व आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोय या निधीतून केली जाणार आहे. हातपंप दुरुस्ती कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये मानधन मिळत होते. हे मानधन वाढवून १८ हजार रुपये देणे, जिल्हा निधीतून उमरी पोतदार येथील आरोग्य केंद्रासाठी जागा खरेदी करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.