७६ गावांत पाणीटंचाईचे सावट
By admin | Published: January 3, 2015 12:54 AM2015-01-03T00:54:34+5:302015-01-03T00:54:34+5:30
२०१४ या वर्षात मान्सूनच्या चार महिन्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यामानाच्या ७२ दिवसांपैकी केवळ २८ दिवस पर्जन्यमान्य झाले. म्हणजेच मान्सून चक्रात एकूण ४४ दिवसांचे पर्जन्यमान कमी झाले.
मंगेश भांडेकर चंद्रपूर
२०१४ या वर्षात मान्सूनच्या चार महिन्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यामानाच्या ७२ दिवसांपैकी केवळ २८ दिवस पर्जन्यमान्य झाले. म्हणजेच मान्सून चक्रात एकूण ४४ दिवसांचे पर्जन्यमान कमी झाले. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या भूजल पातळीवर झाला आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सप्टेंबर २०१४ पर्यंत ०.०६ मीटरने घटली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रामधील तब्बल ७६ गावांत उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याचे संकेत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविले आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी पाणी पातळी मोजली जाते. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर संभाव्य पाणी टंचाई आराखडे तयार करण्याकरीता तसेच संभाव्य टंचाई परिस्थितीचे आकलन करण्याकरीता तालुकानिहाय व पाणलोट क्षेत्रनिहाय निरिक्षण विहिरीतील मान्सूनोत्तर भूजल स्थिर पातळीचा आढावा घेण्यात येतो. या अभ्यासाच्या आधारे संभाव्य पाणी टंचाईचा प्राथमिक तांत्रिक अहवाल तयार करून टंचाईग्रस्त गावांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येते. या अहवालाच्या आधारेच पाणी टंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या सहकार्याने पाणी टंचाई कृती आराखडा आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून असे तीन टप्यात तयार करण्यात येते. पहिल्या टप्यातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून यात ७६ गावांत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ११४४३ चौ.किमी आहे. जिल्ह्यातील वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता व वर्धा नदी खोऱ्यात समाविष्ट असलेल्या ५८ पाणलोट क्षेत्रामधील ४०० लघु पाणलोट क्षेत्रातील १३४ विहिरींचे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस निरीक्षण करण्यात आले. यात मागील पाच वर्षातील आॅक्टोबर महिन्यामधील पाणी पातळी २.६६ मीटर सरासरीच्या तुलनेत यावर्षी घट होऊन २.६० मीटर पाणी पातळी झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वसाधारण हवामान विषम असते. दक्षिण पश्चिमेकडून उत्तर पूर्व दिशेने वाहणारे मौसमी वारे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये (मान्सून कालावधी) बरसात करतात. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ११४२.०७ मिमी आहे. मात्र, २०१४ च्या मान्सून कालावधीत सरासरी ७३.४६ टक्के पर्जन्यमानापेक्षा २६.५३ टक्के कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील ७६ गावांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.