जिल्ह्यातील ७७ हातपंप नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:53 PM2018-03-25T22:53:26+5:302018-03-25T22:53:26+5:30
गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षीचा उन्हाळा सुरू होण्यापुर्वीच पाणी टंचाईची झळ सुरू झाली आहे. अशातच ग्रामीण नागरिकांची तहाण भागविणारे हातपंपही बंद अवस्थेत असल्याने तीव्र पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : गतवर्षीच्या कमी पावसामुळे यावर्षीचा उन्हाळा सुरू होण्यापुर्वीच पाणी टंचाईची झळ सुरू झाली आहे. अशातच ग्रामीण नागरिकांची तहाण भागविणारे हातपंपही बंद अवस्थेत असल्याने तीव्र पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील ७७ हातपंप बंद अवस्थेत असून छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च ग्रामपंचायतीकडून मिळत नसल्याने हातपंप अजूनही बंद आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यात ३६ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. सोबतच नऊ हजारांच्या आसपास हातपंप आहेत. या हातपंपाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे एक पथक आहे. तालुकास्तरावर असलेल्या या पथकाकडे हातपंप दुरुस्तीच्या तक्रारी आल्यावर ते तातडीने तेथे जाऊन दुरुस्तीचे काम करते. यासाठी संबंधीत ग्रामपंचायतीला दुरुस्तीसाठी पैसे द्यावे लागतात.
मात्र, अनेक ग्रामपंचायती देखभाल दुरुस्तीसाठी पैसेच देत नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे दुरुस्तीची कामे रेंगाळली आहेत. दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी बंद हातपंपाचा मुद्दा उपस्थित केला. टंचाईच्या काळात ७७ हातपंप बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटक्ती करावी लागत असल्याचाही मुद्दा मांडला. त्यावर लवकरच या बंद हातपंपाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगत आले.
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार १४० मिमी आहे. मागील वर्षी ८६० मिमी इतकाच पाऊस झाला. सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसाने नदी, नाले आटले आहे. परिणामी चंद्रपूर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असून अन्य भागांतही अशीच स्थिती आहे.