वरोरा पालिकेचे आठ लाख ६९ हजारांचे शिलकीचे अंदाजपत्रक मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:15+5:302021-03-04T04:53:15+5:30
शहरातील सर्वांगीण विकासाकरिता तसेच आरोग्य व मूलभूत सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्याकरिता वरोरा पालिकेने प्राथमिक शिल्लक धरून अंदाजित जमा ...
शहरातील सर्वांगीण विकासाकरिता तसेच आरोग्य व मूलभूत सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्याकरिता वरोरा पालिकेने प्राथमिक शिल्लक धरून अंदाजित जमा रक्कम १०८ कोटी २२ लाख ४२ हजार १३६ प्रस्तावित असून या वर्षात अंदाजित एकूण १०८ कोटी १३ लाख ७२ हजार ५०० खर्च दाखविण्यात आला आहे. सन २०२१- २२ करिता ३१ मार्च २०२२ ला रुपये आठ लाख ६९ हजार ६३६ इतक्या रकमेचे शिलकी अंदाजपत्रक नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी सादर केले आणि ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. अर्थसंकल्पात राज्य नगरोत्थान अभियान अंतर्गत वरोरा शहरातील विस्तारित पाणीपुरवठा योजना राबविणे, प्रधानमंत्री आवास योजना, दिव्यांग लाभार्थ्यांकरिता ३० लाख रुपयांची तरतूद, महिला व बाल विकासाकरिता तरतूद, लायब्ररी, चिल्ड्रन पार्क बांधकाम, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन तसेच मागासवर्ग विकासाकरिता विशेष तरतूद इत्यादी बाबींचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. यावेळी नगरपालिकेचे उपाध्यक्ष अनिल झोटिंग, विरोधी पक्षनेते गजानन मेश्राम, सर्व समिती सभापती, सदस्य उपस्थित होते.