बापरे! एका मिनिटात एका हाताने 'तो' चिमुकला तोडतो ५७ टाईल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 12:21 PM2022-03-23T12:21:22+5:302022-03-23T12:30:12+5:30
चंद्रपूरच्या ८ वर्षीय कबीरने एका मिनिटात ५७ टाईल्स तोडण्याचा रेकॉर्ड केला. त्याच्या या प्रतिभेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अशा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे.
चंद्रपूर : ५७ टाईल्स एका मिनिटात आणि एका हाताने तोडणे, ही काही साधी-सोपी गोष्ट नाही. मात्र, ही किमया साधली ती चंद्रपूरच्या आठ वर्षांच्या एका चिमुकल्याने. कबीर हितेश सूचक असे या चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्या या अफाट प्रतिभेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अशा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे.
स्थानिक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, चंद्रपूरचा विद्यार्थी असलेल्या कबीरला लहानपणापासूनच कराटे खेळाची आवड आहे. यापूर्वीही त्याने कराटेच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. पण, या वेळेस काही वेगळे करावे, या उद्देशाने त्याने हा विक्रम करायचे ठरविले. त्यासाठी त्याने भरपूर सराव करून पूर्वतयारी केली. जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर त्याने पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त केले.
विक्रमाचे सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने समितीच्या सदस्यांना दाखविण्यात आले. त्यानंतर त्यांनी योग्य पद्धतीने त्याचे मूल्यांकन करून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी कबीरने आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्डरूमध्ये नोंदविण्यात यश मिळविले आहे. कबीरने याआधी एका मिनिटात ५० टाईल्स तोडण्याचा रेकॉर्ड केला होता. आता त्याने एका मिनिटात ५७ टाईल्स तोडण्याचा रेकॉर्ड करून नवीन विक्रम प्रस्थापित केला.
फक्त ८ वर्षांच्या चिमुकल्याने हा भीम पराक्रम केल्यामुळे कौतुक होत आहे. यशाचे श्रेय आई, बाबा व सूचक परिवारातील सर्व सदस्य, प्रशिक्षक संतोष, अमर व राकेश यांना दिले.