चंद्रपूर जिल्ह्यात ८० कोटींचे कॅन्सर हॉस्पिटल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:53 PM2017-11-27T23:53:02+5:302017-11-27T23:53:36+5:30

लाईफ लाईन एक्स्प्रेस हा उपक्रम गरीब, गरजू रूग्णांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या उपक्रमाची संकल्पना जेव्हा माझ्यासमोर मांडली गेली.

80 crores cancer hospital will be set up in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात ८० कोटींचे कॅन्सर हॉस्पिटल उभारणार

चंद्रपूर जिल्ह्यात ८० कोटींचे कॅन्सर हॉस्पिटल उभारणार

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : लाईफ लाईन एक्स्प्रेसचा शुभारंभ

आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : लाईफ लाईन एक्स्प्रेस हा उपक्रम गरीब, गरजू रूग्णांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या उपक्रमाची संकल्पना जेव्हा माझ्यासमोर मांडली गेली. तेव्हाच मी हा उपक्रम चंद्रपूर जिल्हयात राबविण्याचे ठरविले. आरोग्य या विषयाला मी नेहमीच अग्रक्रम व प्राधान्य दिले आहे. रूग्णसेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे. या भावनेने मी या क्षेत्रात कार्यरत आहे. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने सुमारे ८० कोटी रूपये खर्चून सर्व सुविधांनी युक्त असे कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत लवकरच रूजू होणार आहे. आरोग्य सेवेचा हा वसा असाच अव्याहतपणे सुरू राहील, अशी भावना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या लेखी भाषणातून व्यक्त केली.
बल्लारपूर येथे भारतीय रेल्वे, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने आणि महिंद्रा फायनान्स यांच्या सौजन्याने लाईफ लाईन एक्स्प्रेस या आरोग्य विषयक उपक्रमाचा शुभारंभ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीरसभेदरम्यान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लेखी भाषण चंद्रपूर जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वाचून दाखविले. यावेळी मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना श्यामकुळे, आ. संजय धोटे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, महिंद्रा फायनान्सचे सुशील सिंग, विजय देशपांडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मोठ्या प्रमाणावर आरोग्य विषयक उपक्रम आम्ही सातत्याने या जिल्हयात राबविल्या आहेत. मूल येथे आरोग्य महामेळावा, कर्करोग निदान शिबिर या उपक्रमांसह मोठया प्रमाणावर नेत्रचिकित्सा शिबिरे आम्ही आयोजित केली. या माध्यमातून ३५ हजार नागरिकांना नि:शुल्क चष्मे वितरित केले. पाच हजार नागरिकांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या. शेकडो नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शस्त्रक्रिया व उपचारासाठी मदत मिळवून दिली. या जिल्हयासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित केले. पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्णालयाला मंजुरी मिळाली, या ग्रामीण रूग्णालयाचे काम निविदा स्तरावर आहे. मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले. शिरडी संस्थानकडून आठ कोटी रुपये किंमतीची एमआरआय मशीन मंजूर करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करण्यासाठी योजना आखून मॉडेल आरोग्य जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हा करण्याचा आमचा मानस आहे. सीएसआरच्या माध्यमातून मूल, चिचपल्ली, नांदगाव, बेंबाळ, धाबा, घुग्घुस, पडोली, बल्लारपूर, विसापूर, पोंभुर्णा, ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर येथील संस्थांना रूग्णवाहीका उपलब्ध करून दिल्या. आरोग्य, शिक्षण, रोजगार या क्षेत्रात भरीव काम करण्याचा माझा मानस व संकल्प आहे, अशी भावनाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.
सतत लोककल्याणाचा विचार उराशी बाळगणारे ना. मुनगंटीवार अनेक नागरिकांसाठी देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी व्यक्त केली. आ. नाना शामकुळे यांनी आपल्या भाषणात ना. मुनगंटीवार यांनी अर्थ व वनविभागाला नवी ओळख मिळवून दिल्याचे सांगत जनहितासाठी सीएसआर निधीचा वापर कसा करावा, याचा आदर्श त्यांनी प्रस्थापित केल्याचे सांगितले. आ. धोटे यांनी दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांसाठी ना. मुनगंटीवार यांनी निधी देवून दिलासा दिल्याचे सांगितले.
असा होणार उपचार
या लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये नेत्रांशी संबंधित उपचार व शस्त्रक्रिया, कानांशी संबंधित आजार व उपचार, फाटलेल्या ओठांची शस्त्रक्रिया, कर्करोग निदान तसेच स्तन आणि गर्भाशयाचे कर्करोगाचे परिक्षण, परिवार नियोजन व आरोग्य सेवा याबाबतच्या उपायांची माहिती, मिरगी तसेच दंतचिकित्सा व त्या संबंधीचे उपचार याबाबत उपचार व शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी इम्पॅक्ट इंडिया या संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

Web Title: 80 crores cancer hospital will be set up in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.