80 दारूविक्री परवान्यांवर प्रशासनाकडून शिक्कामोर्तब ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:00 AM2021-06-30T05:00:00+5:302021-06-30T05:00:28+5:30

जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने ८ जून २०२१ रोजी अधिसूचना जारी केली. त्यामध्ये जुन्या परवान्यांच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती दिल्या आहेत. त्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्याबाहेर स्थलांतरित न झालेल्या तत्कालीन परवानाधारकांनी विनंती केल्यास ३१ मार्च २०१५ रोजी जिल्ह्यात जिथे कार्यरत होत्या, त्याच जागेवर ‘अ‍ॅज इज वेअर इज’ तत्त्वाप्रमाणे २०२१-२२ चे नूतनीकरण शुल्क आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता केल्यास परवानगी देण्याचे नमूद आहे

80 liquor licenses sealed by administration? | 80 दारूविक्री परवान्यांवर प्रशासनाकडून शिक्कामोर्तब ?

80 दारूविक्री परवान्यांवर प्रशासनाकडून शिक्कामोर्तब ?

Next
ठळक मुद्देतीन दिवसांत मुहूर्त : मंजूर परवान्यांत देशीऐवजी बारची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर दुकाने केव्हा सुरू होणार, याकडे मद्यप्रेमींच्या नजरा लागल्या असतानाच नियम व अटींची १०० टक्के पूर्तता झाल्याने सुमारे ८० परवान्यांवर प्रशासनाने अंतिम शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे मंजूर परवान्यांत बारची संख्या अधिक असल्याचे समजते. त्यामुळे येत्या  दोन-तीन दिवसांत दारूची दुकाने सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासनाने याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर केली नाही.
जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने ८ जून २०२१ रोजी अधिसूचना जारी केली. त्यामध्ये जुन्या परवान्यांच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती दिल्या आहेत. त्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्याबाहेर स्थलांतरित न झालेल्या तत्कालीन परवानाधारकांनी विनंती केल्यास ३१ मार्च २०१५ रोजी जिल्ह्यात जिथे कार्यरत होत्या, त्याच जागेवर ‘अ‍ॅज इज वेअर इज’ तत्त्वाप्रमाणे २०२१-२२ चे नूतनीकरण शुल्क आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता केल्यास परवानगी देण्याचे नमूद आहे. त्यानंतर गृह विभागानेही एक आदेश जारी करून नऊ अटी आणि शर्ती लागू केल्या. याशिवाय ११ जून २०२१ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी ११ अटी असलेल्या स्वतंत्र मार्गदर्शक सूचना केल्या. या सर्व अटी व शर्तींमध्ये पात्र ठरलेल्या सुमारे ८० परवान्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली. यामध्ये देशी दारूऐवजी बार परवान्यांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे.

जमिनीच्या वादामुळे अडकले बहुतांश अर्ज

दारूविक्री परवानासाठी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, चंद्रपूर यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या १२६ अर्जांपैकी १२४ अर्जांची संबंधित यंत्रणेने पडताळणी पूर्ण केली. मोका चौकशी करून त्रुटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बहुतांश प्रकरणात जागेच्या अडचणी पुढे आल्या आहेत. जागेबाबत अनेकांमध्ये वाद आहेत. याशिवाय महापालिकेचा कर थकीत असल्याने काही अर्ज मंजुरीविना अडकले. कर विभागानेही थकबाकीदारांची यादी पुढे केली. त्यामुळे अटी व शर्तींची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांची धावपळ सुरूच आहे.

मद्यप्रेमींमध्ये रंगू लागला गप्पांचा फड 
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यापासून मद्यप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यावर लवकरच दारूची दुकाने सुरू होणार, या चर्चेला उधाण आले होते.  निर्बंध हटविल्यानंतर ‘आता तर सुरूच होणार’ असा फड रंगू लागला. दरम्यान, कोराेना डेल्टा प्लस धास्तीमुळे जिल्हा प्रशासनाने सोमवार (दि. २८) पासून निर्बंध लागू केले. त्यामुळे ‘पुन्हा वाट पाहावी लागणार’ यावरून समाजमाध्यमांतही  मद्यप्रेमींची फिरकी घेणारे मिम्स व्हायरल झाले आहेत.
 

दारूविक्री परवान्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी आणि मोका चौकशी करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. सद्य:स्थितीत ८० प्रकरणे सर्व नियम व अटींमध्ये पात्र ठरलीत. मात्र, अंतिम प्रक्रियेला पुन्हा दोन-तीन दिवस लागू शकतात.   
 - सागर धोमकर, अधीक्षक,  उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर

 

Web Title: 80 liquor licenses sealed by administration?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.