चंद्रपूरजवळ सापडला ८०० वर्षापूर्वीचा लोह अवजारे कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 01:49 PM2022-04-18T13:49:55+5:302022-04-18T13:54:48+5:30
चंद्रपूरपासून अगदी काही अंतरावर आणि घंटाचौकी शिवमंदिरापासून एक कि.मी. अंतरावर हा प्राचीन कारखाना होता.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला पुरातन वारसा लाभला आहे. याची अनेक उदाहरणे समोर आली आहे. दरम्यान, चंद्रपूरपासून १५ कि.मी. अंतरावर घंटाचौकी येथील शिवमंदिराजवळील एक किमी परिसरात ८०० वर्षापूर्वीचा लोह अवजारे बनविण्याचा कारखाना असावा, असा अंदाज भूशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी विविध पुरावेही गोळा केले आहे. येथे संशोधन झाल्यास प्राचीन रहस्य आणि पुरावे सापडू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवमंदिर बांधताना दगड फोडण्यासाठी लागणारी छन्नी आणि इतर अवजारे बनविण्यासाठी मातीचे साचे, गाळलेले लोखंड येथे मोठ्या प्रमाणात आढळले असून हा लोहकारखाना ११ किंवा १२ व्या शतकातील परमार राजांच्या काळातील असल्याचेही चोपणे यांचे म्हणणे आहे.
चंद्रपूरपासून अगदी काही अंतरावर आणि घंटाचौकी शिवमंदिरापासून एक कि.मी. अंतरावर हा प्राचीन कारखाना होता. येथून बनविलेली छन्नी आणि अवजारे इतर ठिकाणी दगड फोडून मंदिरे आणि वास्तु बांधण्यासाठी वापरली जात असावी, असा अंदाज प्रा. चोपणे यांनी व्यक्त केला आहे.
विविध मंदिरांचे बांधकाम
घंटाचौकी हे शिव मंदिर नागरी स्थापत्य शैलीनुसार ११ किंवा १२ व्या शतकात राजा जगदेव परमान यांच्या काळात बांधले गेले होते. परमार राजे हे शिवभक्त असल्यामुळे त्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विविध मंदिरे बांधली. या सर्व मंदिराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या दगडांना आकार देण्यासाठी छन्नी आणि इतर अवजारे याच परिसरात तयार केली असावी असेही चोपणे यांचे म्हणणे आहे.
लोह, खनिजाचे तुकडे
घंटाचौकी परिसरातील शिवमंदिराच्या अगदी जवळच लोह खनिज गाळण्याच्या भट्ट्या आढळल्या. जवळच नाला असल्याने तेथील पाण्याचा वापर केला जात असावा. या ठिकाणी आजही लोह खनिज असलेले हजारो खडक आणि लोह तुकडे आढळतात.
१५ वर्षापूर्वी मंदिराच्या मागील बाजूला पडलेल्या घरांची माती आणि मडक्यांचे तुकडे आढळले होते. यावरून येथे लोहारांचे गाव असावे, तेच गाव पुढे घंटाचौकी आणि लोहारा म्हणून प्रचलित झाले असावे. येथे उत्खनन आणि अधिक संशोधन केल्यास प्राचीन रहस्य सापडू शकतात.
-प्रा. सुरेश चोपणे, भूशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक