विमा कंपनीने दिली ८४ लाखांची नुकसान भरपाई; २ हजार प्रकरणे निकाली
By साईनाथ कुचनकार | Updated: March 5, 2024 15:32 IST2024-03-05T15:32:29+5:302024-03-05T15:32:35+5:30
राष्ट्रीय लोकअदालत : २ हजार २८ प्रकरणे निघाली निकाली

विमा कंपनीने दिली ८४ लाखांची नुकसान भरपाई; २ हजार प्रकरणे निकाली
चंद्रपूर - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यामध्ये २ हजार २८ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला. विशेष म्हणजे, मोटार वाहन अपघातातील एका प्रकरणामध्ये विमा कंपनीकडून पक्षकाराला ८४ लाख रुपयांची नुकसान भरपाई पक्षकाराला देण्यात आली.
लोकअदालतीमध्ये प्रलंबित न्यायालयीन १० हजार ३१० व दाखलपूर्व १९ हजार ५४५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी २ हजार २८ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला. मोटर वाहन अपघात नुकसान भरपाईची एकूण १७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. नुकसान भरपाई २ कोटी ९ लक्ष ७१ हजार ३८० रुपये वसूल करण्यात आले. यापैकी एका प्रकरणात सर्वाधिक ८४ लक्ष रकमेचा नुकसान भरपाईसाठीचा धनादेश गोडीजीट विमा कंपनीमार्फत पक्षकाराला देण्यात आला.
पाच कौटुंबिक प्रकरणे मिटली
कौटुंबिक वाद म्हणजेच घटस्फोटाच्या प्रकरणांपैकी पाच प्रकरणांमध्ये पक्षकारांनी एकत्र राहण्याचा समजुतीने निर्णय घेतला. धनादेश प्रकरणांपैकी १०७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. औद्योगिक व कामगार न्यायालयातील सात प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात आली आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायाधीश, सर्व वकील, न्यायालयीन कर्मचारी व पोलिस कर्मचारी आदींनी सहकार्य केल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली