८४० विद्यार्थिनींच्या शालेय गळतीला बसणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:23 AM2019-06-05T00:23:21+5:302019-06-05T00:24:22+5:30
हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अर्ध्यातच शिक्षण सोडाव्या लागणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना राबविण्यात येते. यंदा या योजनेतंर्गत जमा झालेल्या रकमेवर व्याजाचे ६ लाख ३० हजार रूपये जिल्ह्यातील ८४० मुलींना वितरीत करण्याचा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीने पारीत केला.
राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अर्ध्यातच शिक्षण सोडाव्या लागणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना राबविण्यात येते. यंदा या योजनेतंर्गत जमा झालेल्या रकमेवर व्याजाचे ६ लाख ३० हजार रूपये जिल्ह्यातील ८४० मुलींना वितरीत करण्याचा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीने पारीत केला. विशेष म्हणजे, व्याजाची रक्कम वाटप केल्यानंतर उर्वरित ६ लाख ८० हजार रूपये जिल्हा मध्यवर्ती बँकेत एफडी (आवर्ती जमा) केल्या जाणार आहे. या निर्णयाची दरवर्षी अखंडित अंमलबजावणी झाल्यास शेकडो विद्यार्थिंनीच्या शालेय गळतीला पायबंद बसू शकतो.
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कायम ठेवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसह सर्वच कुटुंबातील विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परंतु, शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरही लाभ मिळत नाही, असा आरोप पालक दरवर्षी करतात.
मुलींना शिक्षणाची गोडी लागावी. गळतीचे प्रमाण कमी होऊन मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे, हा योजनेचा मुख्य हेतू आहे. १ ते ८ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत योजनेचा लाभ दिला जातो. जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती कृष्णा सहारे व शिक्षण समितीच्या सदस्यांनी मुलींच्या शिक्षणाविषयी विशेष आस्था कायम ठेवली तरच या योजनेतील रक्कम गरजुंपर्यंत पोहोचू शकते अन्यथा निधी मंजूर होण्याची प्रक्रिया सत्र संपेपर्यंत पूर्ण होत नाही. याला संबंधित अंमलबजावणी यंत्रणेची उदासिनता कारणीभूत असते. यातून पालकांमध्ये नाराजी उमटते असा अनुभव आहे. हा प्रकार टाळण्यासाठी शिक्षण समितीचे सभापती, पदाधिकारी व तज्ज्ञ सदस्यांनी पात्र विद्यार्थिंनीना व्याजासह तत्काळ आर्थिक लाभ वितरीत करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ या कालावधीत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या मूळ रकमेवर ६ लाख ४१ हजार २२ रूपये व्याज जमा झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. आजमितीस जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात सदर योजनेचे १३ लाख १३ हजार ९५६ रूपये शिल्लक आहेत. त्यामुळे निकषात पात्र ठरणाºया जिल्ह्यातील ८४० विद्यार्थिनींच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन प्रती विद्यार्थिनी ७५० रूपये याप्रमाणे ६ लाख ३० हजार रूपये तत्काळ वाटप करण्याचा ठराव शिक्षण समितीने घेतला आहे.
उर्वरित ६ लाख ८० हजार रूपये जिल्हा बँकेत एफडी केल्या जाणार आहे.
नवीन सत्रातही मिळणार लाभ
जे कर्मचारी दत्तक मुलींच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य करू इच्छितात त्यांनी दरमहा विशिष्ट रक्कम जिल्हास्तरीय सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना निधीमध्ये जमा करतात. या योजनेत शिक्षकांनी मोलाचा वाटा दिला. त्यामुळे नवीन सत्रातही पात्र विद्यार्थिनींनी आर्थिक लाभ विहित कालावधीतच वाटप केल्या जाणार आहे.
पंचायत समितीनिहाय लाभार्थी विद्यार्थिनी
पं. समिती विद्यार्थीनी लाभार्थी
चंद्रपूर १११
बल्लारपूर ११
भद्रावती ६२
ब्रह्मपुरी ९०
चिमूर ३३
गोंडपिपरी ४३
कोरपना २१
मूल १०७
नागभीड ५७
पोंभुर्णा ४४
राजुरा ३४
सावली १४२
सिंदेवाही १०
वरोरा ६९
जिवती ८