जावयावर उपचारासाठी ८७ वर्षीय सासऱ्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 11:22 PM2018-05-09T23:22:09+5:302018-05-09T23:22:44+5:30
के.एम. गुप्ता रा. चव्हाणनगर, चंद्रपूर. वय वर्षे ८७. त्यांचे जावई फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहे. मात्र आर्थिक अडचण असल्याने ते जावयाला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास असमर्थ ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : के.एम. गुप्ता रा. चव्हाणनगर, चंद्रपूर. वय वर्षे ८७. त्यांचे जावई फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहे. मात्र आर्थिक अडचण असल्याने ते जावयाला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास असमर्थ ठरले आहे. एखादी संघटना पुढे यावी आणि त्यांनी घरी आजाराशी झुंज देत असलेल्या आपल्या जावयाला रुग्णालयात नेऊन योग्य उपचार करावे, यासाठी केविलवाणी धडपड करीत आहे.
त्र्यंबक उपलंचीवार (५०) रा. बाबूपेठ असे त्यांच्या जावयाचे नाव आहे. वर्षभरापूर्वी त्र्यंबकला खोकल्याचा त्रास झाल्याने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतला. मात्र आजारातून सुटका झाली नाही. डॉक्टरांना त्यांना फुफ्फुसाचा गंभीर आजार झाल्याचे सांगितले. मात्र या आजारावर कुठेही उपचार नसल्याचे सांगितले. या आजारावर एकच गोळी आहे ती आपण रुग्णाला सुरू केली असल्याचे उपचार करणाºया डॉक्टराचे म्हणणे आहे. या आजारात फुफ्फुस कडक होत जाते, असे डॉक्टरचे म्हणणे आहे. तेव्हापासून आपल्या जावयाचा नाहक जीव जाईल, या भीतीने सासरा के.एम. गुप्ता त्यांना चांगला उपचार मिळावा म्हणून धडपडत आहे. आपल्या जावयावर उपचार करण्यासाठी आपल्याजवळ पैसा नाही. तेव्हा एखादी संस्था पुढे येऊन त्यांनी जावयाला चांगल्या रुग्णालयात भरती करून उपचार करावा म्हणून अनेकांचे उंबरठे झिजवत आहे. रुग्ण त्र्यंबक हे एका मूकबधिर शाळेत चतुर्थ कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मात्र सध्या सुटीवर राहून घरीच उपचार घेत आहे. त्यांना श्वास घेण्यास अडचण हा होत असल्याने ते घरीच आॅॅॅक्सिजन लावतात. मात्र पैसा नसल्यामुळे ते पुढील उपचारासाठी कुठेही जावू शकत नाही ही खंत त्यांच्या सासºयांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन व्यक्त केली.