९२ गावांना बसणार पाणीटंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:40 PM2019-02-20T22:40:22+5:302019-02-20T22:41:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १ हजार २६२ मिमी आहे. मागील वर्षी ९०२.५१ मिमी पाऊस पडला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १ हजार २६२ मिमी आहे. मागील वर्षी ९०२.५१ मिमी पाऊस पडला होता. मागील वर्षाच्या तुलनेत केवळ ७९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील ९२ गावांना आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
भूजल सर्वेक्षण व विकास विभागाच्या १३४ निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण वर्षातून तीनदा केले जाते. जानेवारी, मार्च व सप्टेंबर महिन्यात या विहिरीतील पाण्याच्या पातळीची नोंद घेतल्यानंतर पाणीटंचाईची स्थिती जाहीर केल्या जाते. जानेवारी महिन्यात भूजल यंत्रणेने विहिीरींतील पाण्याच्या पातळीची नोंद घेतली. त्यानुसार जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत ०.४९ सेंटिमीटरने घट झाल्याचे वास्तव पुढे आले. बल्लारपूर १.१४ तर भद्रावती तालुक्याची पातळी १.२९ सेंटिमीटरने घटली. अन्य तालुक्यांचीही स्थिती सारखीच असल्याचे पुढे आले. सावली तालुक्यातील १० गावे, कोरपना ८, चिमूर ७, राजुरा ६, भद्रावती ७, आणि चंद्रपूर तालुक्यातील ७ गावांतील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.
पाणी टंचाईसदृश परिस्थितीचा अहवाल संबंधित यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग टंचाई आराखडा तयार करणार आहे. जिल्ह्यातील जिवती, कोरपना, सावली, मूल, सिंदेवाही, चिमूर, राजुरा, चंद्रपूर व भद्रावती तालुक्यातील ४७ गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. यंदा अल्प पाऊस पडल्याने शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली. अनेक शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिके वाचण्यासाठी धडपड करावी लागली. त्यामुळे तत्काळ उपाययोजनेची मागणी केली जात आहे.
तीन गावांची पाणीपुरवठा योजना ठप्प
गांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील निलज, रूई, पाचगाव येथील नळयोजना महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे या गावांतील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जि. प. प्रशासनाने उपाययोजना न केल्याने तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
नीलज, रूई व पाचगाव येथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची नळयोजना आहे. काही महिन्यांपासून ब्रह्मपुरी - आरमोरी या राष्टÑीय मार्गाचे काम सुरू आहे. जुनी पाइपलाईन या मार्गाच्या आड आहे. पुणे येथील कंत्राटदाराकडून महिनाभरापासून नवीन पाइपलाईनचे काम सुरू आहे. पण नवीन पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटली. त्यामुळे गावातील टाकीपर्यंत पाणी पोहोचत नाही. पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. फुटलेल्या पाइपलाइनमधील पाणी आजूबाजूच्या शेतात शिरत आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
पाइपलाईनचे काम निकृष्ट झाल्यानेच ही परिस्थिती उद्भवली. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याला माहिती देण्यात आली. मात्र, दखल घेतली नाही, असा आरोप सरपंच कविता राहाटे, सुजीत बालपांडे, रंजना शिऊरकार आदींनी केल आहे.