९७८ दिव्यांगांना उपयोगी साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:04 PM2018-12-07T23:04:28+5:302018-12-07T23:04:54+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांगांना जीवनउपयोगी साहित्याचे वाटप होत आहे. यामाध्यमातून दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. बल्लारपूर येथील रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यात ९७८ दिव्यांगांना साहित्य वाटप करताना ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांगांना जीवनउपयोगी साहित्याचे वाटप होत आहे. यामाध्यमातून दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. बल्लारपूर येथील रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यात ९७८ दिव्यांगांना साहित्य वाटप करताना ते बोलत होते.
यावेळी आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती व कार्यक्रम संयोजक ब्रिजभूषण पाझारे, कृषी सभापती अर्चना जीवतोडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी ना. अहीर म्हणाले, समाजामधील सर्व घटकांना न्याय देण्याचा दंडक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिला आहे. दिव्यांग हे सामाजिक घटक असून त्यांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे. केंद्र सरकारकडून दिव्यांगांना न्याय देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या.
२०१८-१९ मध्ये दिव्यांगाची नोंदणी करण्याचा कार्यक्रमजिल्ह्यात सुरू झाला. आतापर्यंत ९७८ लोकांची नोंदणी झाली. परंतु हा शेवटचा टप्पा नाही. जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांगांचा शोध घ्यायचा आहे. त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद व अन्य सर्व यंत्रणांनी नोंदणीचे काम सामाजिक दायित्वाच्या जबाबदारीने करावे, असेही त्यांनी नमूद केले. राज्य व केंद्र सरकारचे जे दायित्व आहे त्याला आम्ही विसरता कामा नये. केंद्र शासनाच्या दिव्यांग हिताच्या योजना जिल्ह्यामध्ये लागू होतील आणि सगळ्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल. विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही ना. अहीर यांनी यावेळी दिव्यांगांच्या कुटुंबीयांना दिले. ‘दिव्यांग प्रतिबंधात्मक माहिती व उपाय आणि दिव्यांगाकरिता योजना’ या पुस्तिकेचे ना. अहीर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
दिव्यांग क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी श्रवणयंत्र, एमआर कीट, स्मार्टकाठी, तीन चाकी सायकल व अन्य साहित्याचे वाटप दिव्यांगांना वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. खेमणार म्हणाले, केंद्र शासनाने पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा कायदा केला आहे. हा निधी खर्च झाला नाही तर जिल्हा परिषदेला जमा होतो.
त्यामुळे सर्व दिव्यांगाना निश्चित लाभ मिळेल. यासंदर्भात दिव्यांगांच्या कुटुंबीयांनी जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचेही त्यांनी सांगितले. रोजगार निर्मिती संदर्भात प्रकल्पाची माहिती देण्यात आली. विविध संघटनांकडून दिवसभर सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम झाले.
कार्यक्रमाला नगरसेवक व विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी जाधव व संचालन रवी नलगंटीवार यांनी केले.