'त्या' भीषण अपघाताने गाव झाले सुन्न, दहेलीतील 'ती' सहा कुटुंबे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 10:26 AM2022-05-21T10:26:05+5:302022-05-21T10:31:32+5:30
या भीषण अपघातात कुणाच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, तर कुणाच्या कुटुंबाचा आधारच हिरावला. तर कुणी एकाचवेळी दोघांना गमावले. आता आमचा वाली कोण, असा आक्रोश दहेली गावात ऐकायला येत आहे.
परिमल डोहणे/राजेश खेडेकर
चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावर अजयपूरजवळ लाकडाचा ट्रक व डिझेल टँकरमध्ये झालेला अपघात बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथील सहा कुटुंबांना उद्ध्वस्त करणारा ठरला. या भीषण अपघातात कुणाच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, तर कुणाच्या कुटुंबाचा आधारच हिरावला. तर कुणी एकाचवेळी दोघांना गमावले. आता आमचा वाली कोण, असा आक्रोश दहेली गावात ऐकायला येत आहे.
दहेली हे गाव बल्लापूरपासून राजुरा मार्गावर असलेल्या बामणी गावाजवळ आहे. या गावातील प्रशांत नगराळे, साईनाथ कोडापे, कालू ऊर्फ मंगेश टिपले, महिपाल मडचापे, संदीप आत्राम व बाळकृष्ण तेलंग हे सहा तरुण आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ होते. ते लाकडाच्या ट्रकवर मजूर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होते. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. मात्र नियतीने या सहाही तरुणांसोबत वेगळाच डाव आखला होता. ते कधी परतणार नाहीत, हे मात्र कुणालाही ठाऊक नव्हते. त्यामुळे सर्वच कुटुंब रात्री त्यांची घरी परतण्याची वाट पाहात होते.
रात्री कुणीही परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. काम न झाल्यामुळे ते परतले नसतील, असा धीर त्यांचे कुटुंबीय एकमेकांना देत होते. त्यातच रात्र निघून गेली. मात्र सकाळी अचानक एका ट्रकला लागलेल्या आगीत गावातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची वार्ता धडकताच गावकरी नि:शब्द झाले. ज्याला त्याला विचारणा होऊ लागली. त्यात मृत्युमुखी पडलेले सहा जण गावातील असल्याचे निष्पन्न होताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. घराघरांतून आक्रोश ऐकू येत होता. या अपघातात सहा कुटुंबे एकाएकी उद्ध्वस्त झाली होती. मृतकांमध्ये कुणाचा मुलगा होता. कुणाचे पती होते. तर कुणाचे वडील होते. गावावर पहिल्यांदाच एवढा दु:खाचा डोंगर कोसळला होता. हसत्याखेळत्या गावात एकाएकी शोककळा पसरली.
मृतदेह ओळखण्यातच गेला दिवस
सकाळी घटनास्थळावरून सर्व मृतदेह चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. वैद्यकीय महाविद्यालय गाठून गावकरी व नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. मृतदेहांची राखरांगोळी झालेली असल्यामुळे कोणता मृतदेह कोणाचा, हे ओळखण्यात संध्याकाळ झाली. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मृतदेह मिळाले. गावात गावकरी ग्रामपंचायतीजवळ गोळा होऊन शोकाकुल वातावरणात मृतदेहांची वाट पाहात होते.
अपघातात कुणाची चूक?
दोन वाहनांमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मात्र अपघात होण्यासाठी कुणातरी एका वाहनधारकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले असेल, दोन्ही वाहने भरधाव जात असतील वा एक वाहन भरधाव जात होते की वळणमार्ग अपघाताला कारणीभूत ठरला? यात दोन्ही वाहनचालकांचा होरपळून मृत्यू झाल्याने नेमकी चूक कोणाची, याचा शोध घेण्याची गरज आहे. ही चूक कशी झाली, याचाही शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
कुणी बाप गमावला तर कुणी मुलगा
बाळकृष्ण तेलंग यांच्या कुटुंबात म्हातारी आई, पत्नी, लग्नाची मुलगी आणि शिक्षण घेत असलेला एक मुलगा आहे. घरातील तोच एकमेव कर्ता पुरुष होता. अपघातातील त्याच्या मृत्यूने कुटुंबच उघड्यावर आले आहे. साईनाथ कोडापे आपल्या आईचा एकमेव आधार होता. त्याच्या बहिणीचे काही वर्षांपूर्वीच मंगेश टिपले याच्याशी लग्न झाले होते. या अपघातात साईनाथ व मंगेश या दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे मंगेशची पत्नी व एक दोन वर्षांचा व एक तीन वर्षांचा मुलगा पोरका झाला तर साईनाथची आई ही एकटी पडली आहे. महिपाल मडचापे हा आई-वडिलांचा एकमेव आधार होता. या अपघाताने त्याचा आधार हिरावला आहे. तर अक्षय डोंगरेच्या मृत्यूने आई-वडील व त्याची बहीण पोरकी झाली आहे. तोहगाव येथील संदीप आत्रामच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांचा आधार हरपला आहे.
एकाच चितेवर पाच जणांना अग्नी
मृतदेहाचे चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तोहगाव येथील संदीप आत्रामचा मृतदेह तोहोगावला पाठविण्यात आला. तर दहेली येथील सहाही जणांचे मृतदेह एकाच गाडीमध्ये दहेली येथे नेण्यात आले. रात्री ८ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या पटांगणात सर्वांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर स्मशानभूमीमध्ये एकच चिता रचून सर्वांचे मृतदेह त्याच ठिकाणी ठेवून अग्नी देण्यात आला. हा प्रसंग उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता.