स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी ९ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:47+5:302021-09-06T04:32:47+5:30
चंद्रपूर : शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. जिल्ह्यातील ...
चंद्रपूर : शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधरविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात स्मार्ट स्कूल तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रस्ताव सादर केल्यास ९ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाईल, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, वित्त व बांधकाम सभापती राजू गायकवाड, समाज कल्याण समिती सभापती नागराज गेडाम, कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती सुनील उरकुडे, महिला व बालकल्याण समिती सभापती रोशनी अन्वर खान, सर्व जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, शिक्षणाधिकारी (माध्य.) उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १६ शिक्षकांना चंद्रपूर जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील शिक्षकांसोबत संवाद साधला.
कोरोना संकटात आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडली. यासाठी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
आई- वडिलांनंतर दुसरे स्थान कोणाचे असेल तर ते शिक्षकाचे आहे. एक डॉक्टर घडविण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात तसेच एक शिक्षक घडविण्यासाठी समर्पित भावनेने परिश्रम घ्यावे लागतात असेही ते म्हणाले.