चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीत ९५ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 03:51 PM2021-06-08T15:51:25+5:302021-06-08T15:51:50+5:30
Chandrapur News सिंदेवाही शहरातील आझाद चौक वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या सीताबाई विश्वनाथ बनकर (९५) या आजींनी कोरोना संकटावर यशस्वी मात केली.
पाॅझिटिव्ह स्टोरी
चंद्रपूर : सिंदेवाही शहरातील आझाद चौक वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या सीताबाई विश्वनाथ बनकर (९५) या आजींनी कोरोना संकटावर यशस्वी मात केली. उपचारानंतर त्यांनी नातवाच्या दुचाकीवर घरापर्यंतचा प्रवास केला. मनात जगण्याची उमेद आणि जिद्द असेल तर कोरोनावर मात करणे कठीण नाही हे या आजीने दाखवून दिले.
कोविड चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने २४ मे रोजी सीताबाई बनकर यांना मागासवर्गीय वसतिगृह येथील कोरोना सेंटर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. तब्बल १८ दिवस त्या तेथे उपचार घेत होत्या. दरम्यान, अन्य काही रुग्णांचा त्यांच्या समक्ष मृत्यूही झाला. मात्र प्रचंड आत्मविश्वास त्या बाळगून असल्याने त्या जराही विचलित झाल्या नाहीत. अन्य रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व इतर सुविधा पुरविल्या जात होत्या. परंतु ९५ वर्षीय आजींवर उपचारासाठी कशाचीही गरज भासली नाही. केवळ जगण्याची उमेद होती. या बळावर सीताबाई विश्वनाथ बनकर या आजींनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर त्यांना घरी पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकाही सज्ज होती. मात्र त्यांनी नातू गौरव शेंडे याच्या दुचाकीवर घरी जाणे पसंत केले. त्या घरी सुखरूप घरी पोहोचल्या. आजींची ही जिद्द पाहून अनेकांना त्यांचे कौतुक वाटले.