जिल्ह्यातील ९६ तलावांमध्ये ५० टक्केच जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:39+5:30
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन समजले जाते. मात्र हेच सुरक्षित सिंचन आता धोक्यात आले आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जलाशयात पाणी साठू शकले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. मात्र या तलावातील जलसाठ्याची स्थिती आतापासून चिंताजनक आहे. आसोलामेंढा हा मोठा तलाव वगळला तर इतर ९६ तलावांमध्ये ५० टक्क्यापर्यंत जलसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा आताच गंभीरतेने आणि जपून वापर न केल्यास मुबलक पाऊस पडूनही यंदा उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासू शकते.
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. यवर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांला दिलासा मिळाला. मात्र हा आनंद क्षणिक ठरला. खरीप हंगाम संपला तरीही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आता शेतकरी पुन्हा रबी हंगामाच्या कामात व्यस्त आहे. गहू, हरभरा, भुईमूग, लाखोळी व दुबार धान पिकांची लागवड करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात ९७ पैकी ९६ मामा तलावांमध्ये एकूण सरासरी ५० टक्के जलसाठा आहे. ग्रामीण भागात पसरलेले हे मामा तलावांचे जाळे शेतकºयांसाठी वरदान आहेत. फेब्रुवारी महिन्यातच तलावातील जलसाठा ५० टक्क्यावर आल्यामुळे चिंता वाढली आहे.
असा आहे तलावातील जलसाठा
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. आसोलामेंढा या मोठ्या तलावात ९१.९७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ५०.०८ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात ५०.०० टक्के पाणी शिल्लक आहे.