कामबंद आंदोलनाचा ९ वा दिवस
By admin | Published: March 10, 2017 01:51 AM2017-03-10T01:51:12+5:302017-03-10T01:51:12+5:30
गेल्या नऊ दिवसापासून माजरी, पाटाळा, नागलोन, शिवाजीनगर येथील १२० भूमिहीन प्रकल्पग्रस्तांनी नोकरी मिळावी म्हणून काम बंद आंदोलन पुकारले आहे.
कधी मार्ग मोकळा होणार ? : धमकाविण्याचा प्रयत्न
माजरी: गेल्या नऊ दिवसापासून माजरी, पाटाळा, नागलोन, शिवाजीनगर येथील १२० भूमिहीन प्रकल्पग्रस्तांनी नोकरी मिळावी म्हणून काम बंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाला नऊ दिवस झाले आहेत. या प्रकल्पग्रस्तांना कधी न्याय मिळेल व कधी मार्ग मोकळा होईल, या प्रतीक्षेत ते आहेत. वेकोलि माजरीचे महाप्रबंधक सकाळी येवून प्रकल्पग्रस्तांना विचारणा करुन गेल. गेल्या नऊ दिवसांत १५० हजार टन कोळसा उत्पादन न झाल्याने ४५ कोटींचे नुकसान झाले आहे.
वेकोलि प्रशासनाने न्यायालयात विचाराधिन प्रकरण व अल्पवय प्रकरण वगळता इतर सर्वच प्रकल्पग्रस्तांना शारीरिक वैद्यकीय तपासणी करुन प्रशिक्षणसुद्धा दिले आहे. पण आता टाळाटाळ केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वेकोलि अधिकाऱ्यांची तीन-चार वेळा बैठक घेतली. वेकोलिचे अधिकारी पोलिसांना हाताशी धरुन ‘तुमच्यावर गुन्हा दाखल करतो नाही. तर ही जागा खाली करा’, अशी धमकी देत आहे. परंतु प्रकल्पग्रस्त ही जागा सोडायला तयार नाहीत. तुम्ही गुन्हा दाखल करा किंवा आम्हाला जेलमध्ये टाका. आम्ही नोकरीचे आदेश घेतल्याशिवाय आंदोलन समाप्त करणार नाही, असे पोलिसांना ठणकावले आहे. (वार्ताहर)
कोळसा ढिगाऱ्याला लागली आग
नागलोन खुली कोळसा खाण फेज-२ च्या कोळसा साठाच्या ठिकाणी आग लागली असून बुधवारी पीसी मशिनने माती टाकून आग विझविली. एचएमएस कामगार संघटनेचे वणी-माजरीचे अध्यक्ष सत्यनारायण पांडे यांनी गुरूवारी प्रकल्पग्रस्तांची भेट घतली. त्यांनी आंदोलकांना समर्थनही दिले.