चंद्रपुरात लवकरच ईएसआयसीचे १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय होणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2023 09:52 PM2023-03-06T21:52:30+5:302023-03-06T21:55:02+5:30

घुग्घुस व पोंभूर्णा येथे महाआरोग्य शिबिरात सेवा देणाऱ्या सेवाव्रती डॉक्टर यांचा सत्कार सोहळा संपन्न

A 100 bedded ESIC hospital will soon be built in Chandrapur; Information by Minister Sudhir Mungantiwar | चंद्रपुरात लवकरच ईएसआयसीचे १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय होणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

चंद्रपुरात लवकरच ईएसआयसीचे १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय होणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

googlenewsNext

चंद्रपूर: मूलभूत वैद्यकीय सुविधा या गोरगरिबांचा हक्क आहे. चंद्रपुरातील वैद्यकीय सुविधा एम्सपेक्षाही आधुनिक कशा करता येतील, यासाठी आपले अथक परिश्रम सुरू राहणार आहेत. या प्रयत्नांचे फलित म्हणून चंद्रपुरात लवकरच ईएसआयसीचे १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय होणार आहे. श्रमिकांना या रुग्णालयातून मोफत वैद्यकीय सुविधा मिळतील. विशेष बाब म्हणून केंद्र सरकारने ही विनंती मान्य केल्याची माहिती राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

दरवर्षी ३० जुलैला भव्य महाआरोग्य शिबिर घुग्घुस व पोंभूर्णा येथे संपन्न होते, त्या महाआरोग्य शिबिरात सेवा देणाऱ्या सेवाव्रती डॉक्टर्सच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडु रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, प्रकल्प प्रमुख डॉ. रवि आलुरवार,महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,आएएमए चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अमोल पोद्दार, दंतचिकित्सा प्रमुख डॉ. सुशील मुंधडा,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजयुमो विवेक बोढे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, सर्वांच्या उदंड प्रेमामुळे आपण भारावलो आहे. धन पुन्हा अर्जित करता येते, परंतु आयुष्याचे क्षण गेल्यावर ते पुन्हा अर्जित करता येत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण दिल्याबद्दल आपण या सर्वांचे आभार व्यक्त करतो. महाआरोग्य शिबिरात डॉक्टरांनी मनापासून योगदान दिले. या शिबिराच्या माध्यमातून गोरगरिब व गरजू लोकांच्या आजारांचे वेळीच वैद्यकीय निदान शक्य झाल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर इटोलीमधील एका बालकाला उपचार मिळवून देण्याची संधी प्राप्त झाली. या मुलाच्या हृदयाला छिद्र होते. त्याच्या आईच्या डोळयातील अश्रू थांबत नव्हते. तेव्हापासूनच आपण आरोग्य सेवा शिबिरांचा संकल्प केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. मूल येथे आरोग्य शिबिरात पाच हजार नागरिक येतील असे अपेक्षित होते. परंतु पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती ईतकी गर्दी झाल्याचा उल्लेख करीत मुनगंटीवार यांनी सांगितले की या शिबिराने आपल्याला पायाभूत सुविधांचा आरसा दाखविला. त्यानंतर आमदार, मंत्रिपदावर काम करताना आपण जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकटीकरणाची मोहिमच हाती घेतली. २०१४ मध्ये त्यामाध्यमातून चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निधीची कमतरता भासणार नाही

चंद्रपुरातील वैद्यकीय सेवा-सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुनगंटीवार यांनी दिली. मध्यंतरीच्या दोन वर्षांत सरकार नसल्याने निधी अडला होता; परंतु ती कसर आता भरून काढणार आहे, असे त्यांनी सांगितले. यासाठी विस्तारित निधी देऊन ६५० विद्यार्थी क्षमतेचे कॉलेज उभारले जाईल अशा निश्चयाचा मुनगंटीवार यांनी पुनरुच्चार केला.

‘टाटा कॅन्सर’ रुग्णालय ठरेल जीवनदायी

चंद्रपुरात टाटा कॅन्सर हॉस्पिटलही होत आहे. हे रुग्णालय चंद्रपूरसाठीच नव्हे तर आसपासच्या राज्यातील नागरिकांसाठीही जीवनदायी ठरेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आयुष्यमान भारत योजनेतील रुग्णाालयांना वेळेवर निधी उपलब्ध करून देण्यात यावा याशिवाय या रुग्णालयांची संख्या वाढवावी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून दरवर्षी साजरा होतो-

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवसानिमित्त दरवर्षी सेवा दिन म्हणून साजरा होते. दरवर्षी ३० जुलै ला घुग्घुस येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून घुग्घुस व पोंभुर्णा येथे वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीर राबवले जाते. या महाआरोग्य शिबीरामध्ये १३ हजाराच्या वर रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये, डोळ्यांच्या व इतर शस्त्रक्रिया ५१२, हृदयाच्या शस्त्रक्रिया ८८,गर्भपिशवी शस्त्रक्रिया २३,कॅन्सर शस्त्रक्रिया ५,अपेंडिक्स शस्त्रक्रिया १८,हर्निया शस्त्रक्रिया २२,अन्ननलिका शस्त्रक्रिया ०३,किडनी व लीवर स्टोन शस्त्रक्रिया १२,डोक्याची शस्त्रक्रिया १४, दाताची शस्त्रक्रिया ५४ करण्यात आल्या . २३७८ मोफत चष्मे वाटप करण्यात आले .

Web Title: A 100 bedded ESIC hospital will soon be built in Chandrapur; Information by Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.