आज २०० मीटर व्यासाची उल्का पृथ्वीजवळून जाणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 07:48 PM2023-04-05T19:48:56+5:302023-04-05T19:49:24+5:30
Chandrapur News २०२३ एफएम नावाची २०० मीटर व्यासाची एक उल्का आज दि. ५ च्या मध्यरात्री पृथ्वीजवळून परंतु चंद्राच्या कक्षेबाहेरून जाणार आहे.
चंद्रपूर : २०२३ एफएम नावाची २०० मीटर व्यासाची एक उल्का आज दि. ५ च्या मध्यरात्री पृथ्वीजवळून परंतु चंद्राच्या कक्षेबाहेरून जाणार आहे. प्रति सेकंद १६ किमी असा तिचा वेग राहील, असा दावा चंद्रपुरातील खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांनी केला आहे.
अमेरिकेतील प्रख्यात नासा संस्था २०२३ एफएम नावाच्या उल्केकडे लक्ष ठेवून आहे. या उल्केचा शोध १६ मार्च २०२३ रोजी लागला. उल्केचा मार्ग भरकटला तरच ही उल्का पृथ्वीकडे येण्याची शक्यता आहे. अन्यथा ती सरळ पुढे जाऊन एकतर पृथ्वी प्रदक्षिणा करेल किंवा पुन्हा सौर मालेला वेढा देऊन निघून जाईल, याकडे प्रा. चोपने यांनी लक्ष वेधले. अशा शेकडो उल्का पृथ्वीला प्रदक्षिणा करतात तर हजारो उल्का दरवर्षी पृथ्वीच्या जवळून निघून जातात. २०० मीटर व्यास आकाराची उल्का पृथ्वीवर आदळली तर एखादे शहर नष्ट होऊ शकते इतकी प्रचंड ऊर्जा त्यामध्ये असते. पृथ्वीवर यापूर्वी अशीच एक उल्का बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे ५० हजार वर्षांपूर्वी पडून प्रचंड विनाश झाला होता, अशी माहिती प्रा. चोपने यांनी दिली.