६५ वर्षाच्या आजी निघाल्या मुख्यमंत्र्याच्या भेटीला
By परिमल डोहणे | Published: June 19, 2023 06:30 PM2023-06-19T18:30:13+5:302023-06-19T18:33:43+5:30
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर : एक सामान्य कार्यकर्ता ते शिवसेना पक्षाचे प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा अद्वितीय प्रवास करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वरोरा येथील ६५ वर्षीय आजीने चक्क मुंबई गाठली आहे. मुंबई गोरेगाव येथे शिवसेना (शिंदे गट) तर्फे ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त १९ जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी त्या चंद्रपूर ते मुंबई, गोरेगाव असा २० ते २२ तासाचा बसने प्रवास करून मुंबई पोहचल्या आहेत. देवकाबाई शंकर खिरडकार असे त्या आजीचे नाव आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. १७ फेब्रुवारी २०२३ च्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार या पक्षाचे अध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे. सध्यास्थितीत ते मुख्यमंत्री आहेत. शेतकरी, सर्वसामान्यांसाठी अनेक विकासात्मक धोरणे ते अंवलंबित आहेत. त्यांच्या या अद्वितीय कामगीरीने भारावलेल्या वरोरा येथील ६५ वर्षीय आजी गोरेगाव येथे शिवसेना शिंदे गटातर्फे आयोजित शिवसेना वर्धापन कार्यक्रमासाठी पोहचल्या आहेत.
अनेक शिवसैनिक मुंबईला
चंद्रपूर जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, संपर्क प्रमुख बंडू हजारे, उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख योगिता लांडगे यांच्यासह अनेक शिवसैनिक गोरेगाव येथे गेले आहेत.