तुरुंगातून सुटला अन् दुसऱ्याच दिवशी पैशासाठी भिकाऱ्याचा 'गेम' केला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 11:39 AM2023-09-04T11:39:46+5:302023-09-04T11:40:43+5:30
आरोपीला अटक : गावी परतण्याससाठी पैसे नसल्याने टोकाचे पाऊल
चंद्रपूर : एका गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या आरोपीची कारागृहातून सुटका झाली. मात्र, गावी जाण्यासाठी पैसे नसल्याने भिकाऱ्याकडून बळजबरीने पैसे हिसकावून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी चंद्रपुरातील गोल बाजारात चौकात घडली. पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीने फिरवून भूषण ऊर्फ अजय शालिग्राम (४४) रा. राजोली ता. मूल, याला अंचलेश्वर गेट दारूभट्टी परिसरातून अटक केली. मधुकर गंधेवार (६५) रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे.
दोन सप्टेंबर रोजी दुपारनंतर भूषण ऊर्फ अजय शालिग्राम हा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून एका गुन्ह्याच्या आरोपातून बाहेर आला होता. गावाला परत जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. दरम्यान, गोल बाजार परिसरात भीक मागणारे आणि विठ्ठल मंदिर परिसरातील रहिवासी मधुकर गंधेवार यांच्याकडूून त्याने पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीने आरोपीने मधुकर गंधेवार यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, ठाणेदार सतीशसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हत्या केल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी भूषण ऊर्फ अजय शालिग्राम याला स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक नागेश चतारकर, पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे, स्वामिदास चालेकर, नापोशी अनुप डांगे, गणेश भोयर, जमीर पठाण, मिलिंद चव्हाण, दीपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, पोशी गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रसाद धुळगुंदे, प्रशांत नागोसे यांनी केली.
आरोपीवर पूर्वीच १२ गुन्हे दाखल
भूषण ऊर्फ अजय शालिग्राम हा सराईत गुन्हेगार आहे. त्यावरच यापूर्वीच चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या पाच गुन्ह्यांमध्ये त्याला नऊ महिन्यांची शिक्षा झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दोन दिवसांपासून तो चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगून बाहेर पडताच त्याने हत्येचा गुन्हा केला.
मृत कुटुंबापासून राहत होते वेगळे
मृतक मधुकर गंधेवार (६५) विठ्ठल मंदिर वॉर्ड हे मागील काही वर्षांपासून कुटुंबापासून वेगळे राहत होते. ते टिळक मैदान येथे राहून भीक मागून जगत होते. रविवारी सकाळी गोलबाजार येथे मृतदेह आढळून आला. मृतदेहावर जखम झाल्याचे पोलिसांना दिसून आले. गळा चिरून त्यांची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवत तपास करण्यात आला.