बापरे..! चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुटीचे खोटे पत्र व्हायरल अन्..
By साईनाथ कुचनकार | Published: July 28, 2023 05:21 PM2023-07-28T17:21:22+5:302023-07-28T17:22:58+5:30
पालकांसह, विद्यार्थी, शाळा प्रशासनाची धांदल : अनेक शाळांनी दिली सुटी
चंद्रपूर : जिल्ह्यातील शाळांना दि. २८ ला सुटी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले शुक्रवारी सकाळी एक पत्र सकाळी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या पत्रानंतर अनेक शाळा प्रशासनांनी शाळांना सुटी जाहीर केली. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र जिल्हाधिकाऱ्यांचे नसून कुणीतरी जुन्या पत्रात खोडतोड करून ते व्हायरल केल्याचे लक्षात येताच अनेकांची धांदल उडाली. त्यामुळे चक्क जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेल्या पत्रात खोडसाळपणे बदल करणाऱ्याचा शोध घेणे आता जिल्हा प्रशासनाला आव्हान ठरणार आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानंतर जिल्ह्यात अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी १९, २४ त्यानंतर २७ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली होती. दरम्यान, शुक्रवार, दि. २८ रोजी पहाटेपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. हीच संधी साधत, जुन्या पत्राचा आधार घेत, कुणीतरी तारीख बदलवून पत्र व्हायरल केले.
एक तर सकाळी पाऊस सुरू होता. त्यातच पत्र प्रचंड वायरल झाल्याने पालकांसह शाळा प्रशासनाला सदर पत्र जिल्हा प्रशासनाचे असल्याचे वाटले आणि अनेक शाळांनी शाळांना सुटी जाहीर करून टाकली. व्हायरल पत्र जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर असे पत्र काढलेच नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले. यामुळे मात्र पालकांसह शाळा प्रशासनाची प्रचंड धांदल उडाली.
मुसळधार पाऊस आणि पत्र
शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यातच सुटीचे पत्र व्हायरल झाल्याने अनेकांना हे पत्र प्रशासनाने काढले असल्याचा विश्वास बसला. त्यामुळे काही पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविलेच नाही.
काही वेळातच पत्र प्रचंड व्हायरल
जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले सुटीचे पत्र अगदी काही वेळातच प्रचंड व्हायरल झाले. एवढेच नाही तर काही नागरिक, शिक्षकांनी आपल्या व्हॉटस्ॲप स्टेटसवरसुद्धा हे पत्र ठेवले. यातून एकमेकांना माहिती व्हावी हा उद्देश असला तरी कोणतीही शहानिशा न करता पत्र व्हायरल केल्यामुळे अनेकांना संतापही सहन करावा लागला.
कठोर कारवाईची मागणी
सोशल मीडियावर खोटे पत्र व्हायरल केले. यामुळे अनेकांना नाहक त्रास झाला. सोबतच प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे हे पत्र व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठाेर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.