एमपीएससीचा गड केला सर, शेतमजुराची लेक बनली पोलिस अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 01:54 PM2023-07-08T13:54:19+5:302023-07-08T14:01:26+5:30
झेडपीची विद्यार्थिनी बनली फौजदार : गिरोला गावातील पहिली अधिकारी
राजकुमार चुनारकर
चिमूर : चिमूर-वरोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या सहाशे लोकवस्ती असलेल्या गिरोला गावातील शेतमजुरांच्या लेकीने स्वतः घरीच अभ्यास करीत राज्य लोकसेवा आयोगाच्या पीएसआय परीक्षेत यश मिळवत गावातून पहिली पोलिस अधिकारी बनण्याचा मान मिळविला आहे.
तनुजा खोब्रागडे असे या युवतीचे नाव आहे. चिमूर आणि वरोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गिरोला गावातील गोकुलदास व कांताबाई खोब्रागडे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य. मात्र, पोटाला चिमटा घेत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. घरची परिस्थिती बेताची असल्याने तनुजा व स्वप्निल यांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करावे लागले. दहावीपर्यंतचे शिक्षण सावरी येथील कर्मवीर विद्यालयात घेऊन पुढील शिक्षण चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात बीए(इंग्रजी), एमए (इंग्रजी) विषयात केले. यासाठी तनुजाचा भाऊ स्वप्निल खोब्रागडे पार्टटाइम नोकरी करून तनुजाला शिक्षणात मदत करीत होता. तनुजा लहानपणापासूनच शिक्षणात तल्लख होती. त्यामुळे कर्मवीर विद्यालयाच्या शिक्षकाची ती आदर्श विद्यार्थिनी होती.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने सन २०२० मध्ये घेतलेल्या पीएसआय परीक्षेचा निकाल नुकताच आला असून, तनुजा या परीक्षेत उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिचे पोलिस विभागात अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार झाले आहे. तनुजाने सन २०२१ मध्ये दिलेल्या परीक्षेतसुध्दा यश मिळविले असून, तिचा अंतिम निकाल जाहीर व्हायचा आहे.
मुख्य म्हणजे, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तिने कुठलीही शिकवणी लावली नाही तर स्वतः घरीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून हे यश मिळविले आहे, हे विशेष. जिल्हा परिषदेचे विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत, असा गैरसमज तिने आपल्या कर्तृत्वातून दूर केला आहे. तनुजाने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, शिक्षक व मित्रपरिवारास दिले आहे.
गावकऱ्यांनी केला सत्कार
गावातील नागरिक, पोलिस पाटील, वर्गमित्र यांच्या वतीने तनुजाचा सत्कार करण्यात आला. अंदाजे तीनशे घरांची लोकवस्ती असलेल्या गिरोला गावात आजपर्यंत कुणीच शासकीय नोकरीत नाही तर अधिकारी असणे दूरच राहिले. अशाही गावात पहिली शासकीय नोकरी तीही पोलिस विभागात अधिकारी. तनुजाच्या या कामगिरीमुळे गावकऱ्यांना अभिमान वाटत आहे.