शेतात लावलेल्या जिवंत विद्युततारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 02:28 PM2022-11-16T14:28:25+5:302022-11-16T14:32:13+5:30

बिबी येथील घटना; शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची कुटुंबाची मागणी

A farmer died after in contact with a live electric wire planted in the field | शेतात लावलेल्या जिवंत विद्युततारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात लावलेल्या जिवंत विद्युततारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Next

कोरपना (चंद्रपूर) : तालुक्यातील बिबी येथील माजी सरपंच संतोषकुमार पावडे यांच्या शेतात रानटी जनावरांना मारण्यासाठी लावण्यात आलेल्या जिवंत विद्युततारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बापूजी मारोती कन्नाके (४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत्यू झाला हे कळताच गुन्हा लपविण्यासाठी आरोपीकडून मृत शेतकऱ्याला दुसऱ्या शेतात नेऊन टाकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

बापूजी मारोती कन्नाके हे स्वतःच्या शेतामध्ये पिकाला पाणी देण्याकरिता पहाटेला गेले होते. शेतात जाताना की परतताना शॉक लागला हे अजून कळू शकले नाही. बिबी परिसरात सध्या वाघ व रानटी डुकरांची दहशत आहे. वन्य प्राण्यांकडून संरक्षणासाठी शेतकरी असे जीवघेणे उपाय वापरतात. मात्र, यामध्ये विनाकारण बापूजी कन्नाके या शेतकऱ्याला जीव गमवावा लागला.

या प्रकरणात सध्या शेतात काम करणाऱ्या देवेंद्र सुरेश माणुसमारे (३२) रा. बिबी या शेतमजुराला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. शेती मालक संतोष पावडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे.

श्वानपथकाद्वारे शोध

घटनास्थळावरून मृतदेह दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात नेऊन टाकल्याने आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घटनास्थळावर श्वान पथक दाखल करण्यात आले असून श्वानपथकाद्वारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

मृताच्या कुटुंबाकडून १५ लाखांची मागणी

मृताच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पोलिसांना उचलू देण्यास स्पष्ट नकार दिला. शेतीमालकाच्या चुकीमुळे कुटुंबप्रमुख शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याने मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांकडून १५ लाख रुपयांची मदतीची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: A farmer died after in contact with a live electric wire planted in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.