तीन तास शस्त्रक्रिया करून काढला पाच किलोचा गोळा

By परिमल डोहणे | Published: May 4, 2024 05:06 PM2024-05-04T17:06:42+5:302024-05-04T17:08:07+5:30

Chandrapur : चंद्रपुरातील स्त्रीरोग तज्ज्ञांची यशस्वी शस्त्रक्रिया

A five kg lump was removed after three hours of surgery | तीन तास शस्त्रक्रिया करून काढला पाच किलोचा गोळा

तीन तास शस्त्रक्रिया करून काढला पाच किलोचा गोळा

चंद्रपूर : अंडाशयाला लागून असलेल्या गोळ्यामुळे पोटदुखीने त्रस्त असलेल्या महिलेवर चंद्रपुरातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नगिना नायडू यांनी तब्बल तीन तास अत्यंत गुंतागुंतीची असलेली यशस्वी शस्त्रक्रिया करून जवळपास सहा किलोचा गोळा २७ एप्रिल रोजी बाहेर काढला. त्यामुळे त्या महिलेची पोटदुखीपासून मुक्ती झाली आहे. आता त्या महिलेची रुग्णालयातून सुटी झाली असून, तिची प्रकृती सुव्यवस्थित आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील एका ४९ वर्षीय महिलेच्या पोटात साधारणत: एक वर्षभरापासून दुखत होते. सुरुवातीला त्या महिलेने साधे दुखणे असल्याचे समजून त्याकडे कानाडोळा केला. मात्र, दुखणे अधिकच वाढत गेल्याने त्यांनी भद्रावतीतील रुग्णालयात दाखवून उपचार केला. तरीही दुखणे सुरूच होते. मात्र, काही कालावधीनंतर त्यांच्या पोटाचा आकारही वाढू लागला होता. त्यामुळे २६ एप्रिल रोजी त्यांनी चंद्रपुरातील नायडू हॉस्पिटल गाठून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नगिना नायडू यांना दाखवले. त्यांनी तपासणी करताच पोटात गोळा असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी त्या महिलेला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर अंडाशयाला लागून गोळा असल्याचे निदान झाले. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नगिना नायडू यांनी त्या महिलेला शस्त्रक्रिया करून तो गाळे काढावा लागतो, असे सांगून शस्त्रक्रियेची तयारी सुरू केली. दरम्यान, २७ एप्रिल रोजी त्या महिलेवर डॉ. नगिना नायडू यांनी आपल्या सहकार्यासह तिच्यावर सुमारे तीन तास अत्यंत गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करून तो गोळा काढला. ॲनेस्थेलॉजिस्ट डॉ. प्रवीण डोंगरे यांनी सहकार्य केले. १ मे रोजी त्या महिलेला संपूर्ण उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता त्या महिलेची प्रकृती सुव्यवस्थित आहे.

त्या महिलेच्या अंडाशयाला लागून गोळा असल्याचे निदान सोनोग्राफीतून झाले होते. त्यात सुमारे पाच लिटर पाणी होते. त्यामुळे तो गोळा काढणे गरजेचे होते. याबाबत त्या महिलेच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर जवळपास तीन तास शस्त्रक्रिया करून तो गोळा बाहेर काढण्यात आला. त्या महिलेची प्रकृती योग्य असून, १ मे रोजी तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
-डॉ. नगिना नायडू, स्त्रीरोग तज्ज्ञ, चंद्रपूर

गोळ्यात तयार झाले होते पाणी

एक वर्षभरापासून त्या महिलेला हा त्रास होता. मात्र त्याचे योग्य निदान होत नसल्याने तो गोळा वाढत जात होता. जसजसा गोळा वाढत जात होता, तसतसे पोटही फुगत होते. डॉ. नगिना नायडू यांनी तपासणी केल्यानंतर गोळा असून, त्यामध्ये जवळपास पाच लिटर पाणी तयार झाले असल्याचे निदान झाले. तो गाेळा त्वरित काढला नसता तर कदाचित तो गोळा फुटण्याची भीती होती.

 

Web Title: A five kg lump was removed after three hours of surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.