बाप तो बापच! तापाने फणफणलेलं लेकरू अन् उपचारासाठी 'त्याची' पुरातून पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 10:47 AM2022-07-15T10:47:49+5:302022-07-15T11:39:32+5:30
श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही व बाहेर पूरपरिस्थिती अशा परिस्थितीत शामराव मुलाला घेऊन पुराच्या पाण्यातून उपचारासाठी रुग्णालयाकडे निघाले.
राजेश माडुरवार
वढोली (चंद्रपूर) : मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही. नदी, नाल्यांना पूर. मात्र बाप तो बापच. मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरात पाय ठेवला. पुरातून पायी मार्ग काढत मुलावर उपचार करण्यासाठी दुसऱ्या गावाला घेऊन गेला. या जिगरबाज बापाचे नाव आहे, श्यामराव पत्रूजी गिनघरे. तो गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील रहिवासी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे वर्धा, वैनगंगा नदीला पूर आला. पोडसा हे गाव वर्धा नदीच्या काठावर वसले आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे गावाला बेटाचं स्वरूप आले आहे. गावातील श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा कार्तिक याला ताप आला. तापाने तो फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही. दुसरीकडे दुसऱ्या गावाला जाणारे मार्ग पुराने वेढलेले. मात्र बाप मुलाची वेदना बघू शकला नाही. पोडसा गावापासून पाच ते सहा कि. मी. अंतरावर वेडगाव हे गाव आहे. येथे खासगी डॉक्टर आहेत. मुलाला खांद्यावर घेऊन भर पुरातून श्यामराव मार्ग काढत गेला. मुलावर उपचार केला अन् परत पुरातून मार्ग काढीत गावाकडे आला.
चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूरस्थिती आहे. नदी-नाले ओसांडून वाहत असून अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेकडो घरे पुराच्या पाण्याखाली आली असून हजारावर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अशावेळी मुलाच्या उपचारासाठी बापाला भरपूरातून जावे लागले. बापाची लेकरासाठीची ही तळमळ पाहून अवघा गाव गहिवरला.