मित्राने फोन करून पानठेल्यावर बोलाविले आणि केला ‘गेम’; प्रेम प्रकरणातून काटा काढल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 09:34 PM2023-05-20T21:34:45+5:302023-05-20T21:35:16+5:30
Nagpur News वरोरा शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकावर भरदिवसा काठीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि.२०) सकाळी ९ वाजेच्या सुमारास विकासनगरात घडली.
चंद्रपूरः वरोरा शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकावर भरदिवसा काठीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि.२०) सकाळी ९ वाजेच्या सुमारास विकासनगरात घडली.
रितेश रामचंद्र लोहकरे (वय २०), रा. विकासनगर, वरोरा, असे मृताचे नाव आहे. हत्येनंतर एलसीबीच्या पथकाने चार तासांतच आरोपी गोलू ऊर्फ अमिनीश रेड्डी याला अटक केली. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
रितेश लोहकरे हा युवक शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शनिवारी सकाळी त्याच्या एका मित्राने रितेशला फोन करून त्याच्या घरानजीकच्या पानठेल्यावर बोलाविले. तिथे काही युवक आधीच रितेशची वाट बघत होते. रितेश आणि त्या तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी रितेशवर काठीने हल्ला चढविला. त्यात रितेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हे सर्व युवक घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला. शवपरीक्षणानंतर कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. हत्येप्रकरणी एकाला अटक केली; परंतु हत्येचा घटनाक्रम गुलदस्त्यात ठेवल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले मारेकऱ्यांचे वर्णन
महाविद्यालयीन युवक रितेश लोहकरे याला काठीने बेदम मारहाण करताना विकासनगरातील पानठेला चौकात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. एलसीबीच्या पथकाने आरोपी गोलू ऊर्फ अमिनीश रेड्डी याला अटक केली. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी आणखी काही युवकांची नावे सांगितल्याने पाेलिस कसून तपास करीत आहेत.
एसपींनी जाणून घेतली माहिती
भरदिवसा महाविद्यालयीन युवकाची हत्या झाल्याचे कळताच पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी वरोरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्याकडून इत्थंभूत माहिती सकाळी जाणून घेतली. या प्रकरणातील सर्व संशयितांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करावी, असे निर्देश दिले.
हत्या प्रकरणात एकाला अटक केली. मात्र, प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. हत्या प्रकरणातून कुणीही आरोपी सुटू नये, यादृष्टीने तपास सुरू आहे. हत्या प्रेम प्रकरणातून झाली का, याबाबतही चौकशी केली जात आहे.
-अमोल काचोरे, ठाणेदार, वरोरा