शंभरावर सासू-सुनेच्या जोड्यांची अशीही धम्माल, मूलमध्ये आगळावेगळा सासू-सून मेळावा
By परिमल डोहणे | Published: February 12, 2024 06:53 PM2024-02-12T18:53:14+5:302024-02-12T18:54:04+5:30
यावेळी सासू-सुनेसाठी आयोजित स्पर्धेत शंभराहून अधिक सासू-सुनेच्या जोड्यांनी सहभाग घेऊन धम्माल केली.
चंद्रपूर : ‘सासू-सून’ या नात्याकडे जराशा तिरकसच नजरेने बघितले जाते. मात्र, हे नाते खुलावे, सासू-सुनेत आपुलकीचे नाते तयार व्हावे, या उद्देशाने भूमिपुत्र महिला ब्रिगेडच्या वतीने मूल येथे सासू-सून मेळाव्याचे आयोजन रविवारी ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी सासू-सुनेसाठी आयोजित स्पर्धेत शंभराहून अधिक सासू-सुनेच्या जोड्यांनी सहभाग घेऊन धम्माल केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकला गावतुरे यांची उपस्थिती होती. यावेळी सासु-सुनेसाठी एक मिनिट संवाद स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, वेगवेगळे खेळ घेण्यात आले. तसेच ‘मी सावित्री बोलतेय’ या एकांकिकेचे सादरीकरण कविता संगोजवर यांनी केले. सासू-सुनांच्या दैनंदिन जीवनावर आधारित लघु नाटिकेचे सादरीकरण शुभांगी शेंडे व त्यांच्या चमूने केले. चंद्रपूरचे सायकॉलॉजिस्ट डॉ. दुर्गाप्रसाद बनकर यांनी ‘नांदा सौख्यभरे’ या प्रबोधनातून सासू-सुनांमधील संवाद तसेच दोन व्यक्तींमधील संवाद सुधारण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत, यावर मार्गदर्शन केले. विजेत्यांना शशिकला गावतुरे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. संसारिक महिलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे आयोजक भूमिपुत्र महिला ब्रिगेडच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले. यशस्वीतेसाठी सीमाताई लोनबले, शुभांगी शेंडे, रत्नाताई चौधरी, आशाताई नागोसे, पूनम मोहुर्ले, मीराताई शेंडे, जयश्री भुस्कडे, प्रियाताई गुरनुले, सोनू मोरे, स्मिता बांगडे, वैशाली निकुरे, वंदना गुरनुले, स्मिता गुरनुले, चित्रा गुरनुले, कविता संगोजवार आदींनी परिश्रम घेतले.