शिकारीच्या शोधात बिबट शिरला वस्तीत; तब्बल सात-आठ तास वनविभागाची गस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 10:49 AM2023-10-31T10:49:30+5:302023-10-31T10:49:58+5:30
बेशुद्ध करून केले जेरबंद
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : शहरालगतच्या उदापूर येथील एका गोठ्यात बिबट शिरल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान उजेडात आली. नर बिबट (अंदाजे दोन वर्षे) शिकारीच्या शोधात भटकत वस्तीत आला असावा, अशी शक्यता आहे. वनविभागाने संपूर्ण गोठा जाळीने बंद करीत पिंजरा लावला. मात्र, अथक प्रयत्नानंतरही बिबट पिंजऱ्यात शिरत नव्हता. त्यानंतर ताडोबा येथील शूटर यांनी सोमवारी पहाटे २ वाजताच्या दरम्यान डॉट मारून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आले.
ब्रह्मपुरीलगतच्या उदापूर येथील रहिवासी प्रकाश संगोडकर यांच्या घराच्या गोठ्यात बिबट असल्याचे नागरिकांना रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास लक्षात आले. लगेच वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाची चमू पोहोचेपर्यंत बिबट गावात आल्याची माहिती सर्वत्र पसरली. बिबट पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. त्यामुळे गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.
वनविभागाने संपूर्ण गोठ्याला जाळी लावून बंद केले. मात्र, बिबट पिंजऱ्यात येत नव्हता. तब्बल सात-आठ तासानंतर रात्री उशिरा ताडोबा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रमाकांत खोब्रागडे, शूटर अजय मराठे यांना बोलावण्यात आले. अजय मराठे यांनी सोमवारी पहाटे डॉट मारून बिबट्याला पिंजराबंद केले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून निसर्गमुक्त करण्यात आले. यावेळी सहायक वनसंरक्षक चोपडे, आरएफओ नरड यांच्यासह वनविभागाची चमू उपस्थित होती.