ब्रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद
By परिमल डोहणे | Published: January 10, 2024 06:23 PM2024-01-10T18:23:56+5:302024-01-10T18:24:20+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव ,पिंपळगाव, नांदगाव, कन्हाळगाव या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाने अखेर बुधवारी जेरबंद केले.
चंद्रपूर: ब्रह्मपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव ,पिंपळगाव, नांदगाव, कन्हाळगाव या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाने अखेर बुधवारी जेरबंद केले. नांदगाव ते कन्हाळगाव शेतशिवारात नहराच्या शेतीला पाणी सोडणाऱ्या लहान भोंग्यामध्ये बिबट जाताना नहरालगत असलेल्या शेतकऱ्यांनी पाहिले. त्यांनी गावामध्ये येऊन शेतकरी व इतर लोकांना याबाबत सांगितले. लोकांनी बिबट्या लपून असलेल्या भोंग्याकडे धाव घेतली आणि त्या भोंग्याचे तोंड सिमेंटच्या रिकाम्या थैल्या, रिकामे पोते यांच्या साहाय्याने बंद करून ठेवले.
लगेच त्यांनी वनविभाग ब्रह्मपुरीला फोन करून याची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी सेमसकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या लपून असलेल्या परिसराची पाहणी करून बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी पिंजरा बोलाविला. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने ब्रह्मपुरी पोलिस प्रशासनाला याची माहिती देऊन घटनास्थळी पोलिसाची कुमक बोलाविली.
पोलिसांनी शांततेने वनविभागाला सहकार्य करण्याचे जनतेला आवाहन करून घटनास्थळापासून लोकांना दूर जाण्याची सूचना केली असता लोकांनी घटनास्थळावरून गर्दी कमी केली. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्याला जेरबंद केले. बिबट्या जेरबंद झाल्याचे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.