Chandrapur : दोन चिमुकल्यांवर हल्ला करणारा 'तो' बिबट अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 03:01 PM2022-10-11T15:01:22+5:302022-10-11T15:03:12+5:30
आयुध निर्माणी परिसरात होता वावर : रविवारी रात्रीच अडकला पिंजऱ्यात
भद्रावती (चंद्रपूर) : गेल्या पंधरवड्यात आयुध निर्माण चांदाच्या सेक्टर ४ मधील वसाहतीत दोन चिमुकलींवर हल्ला करणारा बिबट अखेर पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. सोमवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बिबट्याला भद्रावती वनपरिक्षेत्रातील रोपवाटिकेत ठेवण्यात आले.
चंद्रपूर येथील विभागीय वनअधिकारी खाडे, सहायक उपवनसंरक्षक निकिता चौरे व वन परिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक विकास शिंदे, बीट वनरक्षक धनराज गेडाम तथा वन कर्मचारी, सार्ड वन्यजीव संस्थेचे श्रीपाद भाकरे, अमोल कुचेकर, अनुप येरणे, प्रणय पतरंगे, आशिष चायकाटे, इम्रान पठाण, शैलेश पारेकर आदींच्या सहकार्याने बिबट्याला जेरबंद करून वन विभागाच्या रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यास कोणत्या जंगलस्थळी सोडायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.