शिवरायांची वाघनखे, जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

By राजेश भोजेकर | Published: May 11, 2023 11:15 AM2023-05-11T11:15:39+5:302023-05-11T11:16:03+5:30

सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पार पडली बैठक

A London-based Marathi entrepreneur will help to bring back Shivray Vaghankhe, Jagdamba Talwar | शिवरायांची वाघनखे, जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

शिवरायांची वाघनखे, जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

googlenewsNext

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित मराठी उद्योजकांनी घेतला आहे. मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री दहा वाजता सुधीर मुनगंटीवार यांनी आंतरजालीय दूरदृष्य प्रणालीद्वारे लंडनस्थित मराठी उद्योजकांशी संवाद साधला, तेव्हा या मराठी उद्योजकांनी हा प्रतिसाद दिला.

सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनस्थित मराठी उद्योजकांच्या 'ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल्स अॅण्ड आंत्रप्रेन्युअर्स ग्रुप - यूके' (ओमपेग - युके) या संघटनेच्या पदाधिकारी आणि सभासदांसोबत आंतरजालीय दूरदृष्य प्रणालीद्वारे  ही बैठक आयोजित केली होती. या संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री रवींद्र  गाडगीळ, आशुतोष देशपांडे, अभिजीत देशपांडे आणि जय तहसिलदार यांच्या पुढाकाराने ही बैठक यशस्वी झाली. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी विविध प्रश्नांनाही मनमोकळी उत्तरे दिली. लंडनस्थित मराठी उद्योजकांनी महाराष्ट्राच्या वन खात्याच्या,  सांस्कृतिक कार्य खात्याच्या आणि मत्स्यव्यवसाय खात्याच्या विविध कार्यक्रम आणि योजनांमधेही सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे यांचे ऐतिहासिक महत्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतीय इतिहासातील महत्व, शिवराज्याभिषेकाचा यंदा होणारा त्रीशतकीय सुवर्णमहोत्सव, त्यानिमित्ताने राज्यभर आयोजित करण्यात येत असलेले विविध कार्यक्रम यांची माहिती आपल्या वक्तव्यात दिली. ब्रिटनच्या भारतातील उपउच्चायुक्तांसोबत जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात परत आणण्या विषयी झालेली प्राथमिक चर्चा यांची माहिती दिली. ब्रिटनमधील भारतीय आणि विशेषतः मराठी लोकांनी ब्रिटिश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहून जगदंब तलवार आणि वाघनखे भारताला परत देण्याची मागणी करावी असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्याप्रमाणे ब्रिटिश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहिण्याचा निर्णय आणि त्याकामी ब्रिटनस्थित सर्व भारतीयांचा सहभाग घेण्याचाही यावेळी 'ओमपेग - युके' च्या पदाधिकाऱ्यानी घेतला आहे. त्याचबरोबर विविध ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकारी आणि ब्रिटिश सरकारमधील उच्चपदस्थ राजकारणी यांच्या भेटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे भारताला परत करण्याची मागणी करण्याचाही निर्णय या संघटनेने घेतला आहे.

सुुधीर मुनगंटीवार हे जगदंबा तलवार आणि वाघनखे भारतीत आणण्यासंदर्भात ब्रिटिश सरकारशी बोलणी करण्याकरता जेव्हा लंडनला जातील, तेव्हा त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आणि या दैवी कार्यात आवश्यक तो सर्व सहभाग देण्याचे लंडनस्थित मराठी उद्योजकांनी या आंतरजालीय दूरदृष्य प्रणाली बैठकीतून आश्वासन दिले आहे. त्याबद्दल ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच लंडनस्थित मराठी उद्योजकांनी ब्रिटनमधील इतर व्यवसायातील मराठी सोबतच अन्य भारतीय व्यावसायिक व नोकरदार मंडळींना याकामी सोबत घ्यावे असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले आहे. त्याला लंडनस्थित मराठी उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Web Title: A London-based Marathi entrepreneur will help to bring back Shivray Vaghankhe, Jagdamba Talwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.